खाजगी बस अनधिकृत पार्क केल्यास १५ हजार दंड, १ सप्टेंबर पासून अंमलबजावणी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

19 August 2019

खाजगी बस अनधिकृत पार्क केल्यास १५ हजार दंड, १ सप्टेंबर पासून अंमलबजावणी


मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रात खासगी बसेससाठी माफक दरात वाहनतळ उपलब्ध करण्यात आले असतानाही अनेक खासगी बसेस रस्त्यावर पार्क केलेल्या आढळून आले आहे. त्यामुळे अशा बसेसच्या अनधिकृत पार्किंगवर येत्या १ सप्टेंबरपासून कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधितांवर अनधिकृत पार्किंग दंडापोटी १० हजार रुपये, टोचन शुल्क म्हणून ५ हजार असे एकूण १५ हजार रुपये आकारले जाणार आहे. सदर 'बस' पुन्हा अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळल्यास ती जप्त करुन तिचा लिलाव करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोमवारी दिले.

महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी परदेशी यांनी याबाबत निर्देश दिले. या बैठकीला मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे प्रमुख रमानाथ झा, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व गतिमान व्हावी; तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून साधारणपणे साडे तीन हजार बसेस पार्क होऊ शकतील, अशा २४ बेस्ट डेपो व ३७ बेस्ट टर्मिनलच्या जागांवर अत्यंत माफक दरात वाहनतळ सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही आतापर्यंत केवळ ४१२ वेळा या सुविधेचा लाभ घेण्यात आला असून अनेक खाजगी बस अजूनही रस्त्यांवर 'पार्क' केल्याचे आढळून येत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याला चाप लावण्यासाठी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर अनधिकृतपणे 'पार्क' करण्यात आलेल्या बसगाड्यांवर येत्या १ सप्टेंबर पासून पोलिसांच्या सहकार्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईतून बेस्ट बसेस व शालेय बसगाड्यांना वगळण्यात आले आहे.
 
मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत व वेगवान व्हावी, या उद्देशाने ७ जुलै पासून मुंबई पोलीसांच्या सहकार्याने अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटरच्या परिसरात आढळून येणा-या अनधिकृत पार्किंगवर नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. खाजगी बसगाड्यांना 'पार्क' करण्यासाठी २४ बेस्ट डेपो व ३७ बस टर्मिनल येथे अत्यंत माफक दरात वाहनतळाची सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी दिवस व रात्री उपलब्ध असणारी सुविधा लक्षात घेता कमाल ३ हजार ४९५ एवढ्या संख्येने बसगाड्या पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. मात्र, असे असूनही अनेक प्रकरणी बसचालक किंवा मालक हे या सुविधेचा लाभ न घेता रस्त्यांवर बस पार्क करत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे ही सुविधा सुरु करण्यात आल्यापासून आजवर केवळ ४१२ वेळा खाजगी बसगाड्या या बेस्टच्या जागेत पार्क करण्यात आल्या होत्या. म्हणजे सरासरी केवळ २० गाड्या या ठिकाणी 'पार्क' करण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी केवळ ३७९ बसगाड्यांसाठी 'मासिक पास' काढण्यात आले आहेत.

Post Top Ad

test