Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आझाद मैदानात शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार

मुंबई - समान कामाप्रमाणेच समान वेतन देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी अमानूष लाठीमार केला. त्यात १० ते १५ शिक्षक जखमी झाले. उद्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक असल्याने या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न तातडीने घेऊन त्यावर तोडगा काढण्यात यावा, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.

विनाअनुदानित शिक्षकांनाही समान कामाप्रमाणे समान वेतन देण्यात यावं, शंभर टक्के अनुदान देण्यात यावं आदी मागण्यांसाठी आज दुपारी आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर अमानूष लाठीमार केला. अचानक झालेल्या लाठीमारामुळे मोर्चेकऱ्यांची एकच धावपळ उडाली आणि आझाद मैदानात गोंधळ उडाला. त्यात १० ते १५ शिक्षक जखमी झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे आझाद मैदानात तणावाची स्थिती निर्माण झाली. विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन चिघळल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस उपायुक्तांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याशी त्वरित संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळांना शेलार यांनी भेटायला बोलावल्याचं पोलिसांनी मोर्चकऱ्यांना सांगितलं. त्याला मोर्चेकऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला. मंत्र्यांनाच आझाद मैदानात बोलवण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली. मात्र पोलिसांच्या शिष्टाईमुळे अखेर पाच जणांचं शिष्टमंडळ शिक्षण मंत्र्यांना भेटायला गेलं.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom