पुरामुळे मुंबईचा दूधपुरवठा ३० टक्क्यांनी घटला

JPN NEWS
मुंबई - कोल्हापूर व सांगलीतील पुरामुळे दैनंदिन ८० लाख लिटरपैकी २४ लाख लिटर, म्हणजे ३० टक्के दुधाचा पुरवठा कमी झाला आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. अमूल, मदर्स डेअरी व महानंदा या तीन कंपन्यांचा जवळपास २० लाख ७० हजार लिटर दुधाचा पुरवठा सुरळीत आहे. याखेरीज मुंबईतीलच अन्य छोट्या कंपन्या जवळपास ३५ लाख लिटर दुधाचा पुरवठा करतात. त्यांच्यावर पुराचा परिणाम नाही. कोकण परिसरातून होणाऱ्या दुधाचा पुरवठादेखील थांबला आहे. रायगड जिल्हा तसेच पेण आणि ठाणे जिल्हा व भिवंडीतूनही मुंबईला जवळपास १० लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. पण तेथील संकलनही जोरदार पावसामुळे थांबले आहे.

प्रामुख्याने गोकुळ व वारणा, या दोन मोठ्या कंपन्यांचे दूध उत्पादन सांगली, कोल्हापूर व सातारा या पट्ट्यात होते. या कंपन्या गावागावांतील शेतकऱ्यांकडून दूध संकलित करून त्याचा पुरवठा करतात. या कंपन्यांच्या दुधाची सर्वाधिक मागणी मुंबईतून असते. एकट्या गोकुळकडून रोज साडे सात लाख लिटरचा पुरवठा होतो. तर वारणासह अन्य काही छोट्या कंपन्या जवळपास साडे सहा लाख लिटर दुधाचा याच भागातून मुंबईला पुरवठा करतात. पण या तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास प्रत्येक गाव पुराच्या वेढ्यात आहे. त्यामुळे दुधाचे संकलन पूर्णपणे थांबले आहे. कोल्हापूर-मुंबई महामार्गदेखील पाण्याखाली असल्याने संकलित झालेल्या दूधाचा या कंपन्या पुरवठा करू शकलेल्या नाहीत. 
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !