मुंबईत १० वर्षांत सर्वाधिक ६१६ मूत्रपिंडांचे दान

Anonymous
मुंबई : २००९ ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत मुंबईत सर्वाधिक अवयवदान झाले आहे. यामध्ये ६१६ मूत्रपिंडांचे दान झाले असल्याची आकडेवारी झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी)ने जाहीर केली आहे. अवयवदानाची गती मुंबईने कायम राखली असून अवयवदानाच्या अनुषंगाने अव्वल पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राची गणना होण्यासाठी मुंबईने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असेही समोर आले आहे.

वास्तविक भारत सध्या अवयवांच्या दुष्काळाला सामोरा जात आहे. अवयवदानाच्या कमतरतेमुळे किंवा अनुपलब्धतेमुळे दरवर्षी सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातील अवयवदानाचा दर लोकसंख्येच्या प्रमाणात ०.३ दशलक्ष म्हणजे खूपच कमी आहे. तुलनेत काही पश्चिमी देशांत तो बराच म्हणजे ३६ दशलक्ष आहे आणि अमेरिकेत तो २६ दशलक्ष आहे. अवयवदान कार्यक्रमात खासगी रुग्णालयांचे सर्वात मोठे योगदान आहे. खासगी रुग्णालयांच्या मदतीमुळे सरकारी संस्थांमध्ये या कार्यक्रमास चालना देण्यास मदत झाली. तज्ज्ञांच्या मते, एक ब्रेन डेड डोनर आठ जीव वाचवू शकतो, शेवटच्या अवस्थेतील अवयव निकामीमुळे ग्रस्त लोकांचे जीवन वाचू शकते. अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची गरज असून त्याच वेळी या उदात्त कारणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी सरकार आणि आरोग्य सेवा प्रदात्यांनी आणखी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असा सूरही आरोग्य क्षेत्रातून उमटत आहे. नॉन-हार्ट बीटिंग डोनेशन (एनएचबीडी) ही संकल्पना भारतात आणून ऑर्गन पूलही वाढवता येतो. मेंदू मृत झाल्यानंतर होणाऱ्या नेहमीच्या देणग्यांपेक्षा एनएचबीडी वेगळे आहे, त्यास यशस्वी होण्यासाठी अधिक समन्वय व समर्पित टीमची आवश्यकता असते, तसेच त्यासाठी भारतात कोणतीही निर्धारित मार्गदर्शक तत्त्वेही नाहीत.
Tags