शरद पवारांना चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती - उद्धव ठाकरे

JPN NEWS


मुंबई: '२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले होते. हा चोंबडेपणा करण्याची त्यांना गरज नव्हती. शरद पवारांनी २०१४ साली जे केले, त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष आता भोगतोय,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला अभूतपूर्व विजय आणि आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातही भाजपचेच सरकार येणार हे जवळपास निश्चित असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा लोकांना कावळ्याची उपमा दिली आहे. मावळ्यांच्या जोरावर पक्षबांधणी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पवारांच्या या आशावादावर उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. 'जे कावळे राष्ट्रवादीतून उडाले त्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते,' असा सवाल उद्धव यांनी केला आहे. 'पवारांच्या पक्षाला लागलेली गळती हे त्यांच्या आजवरच्या धोरणाचे परिणाम आहेत', असं म्हणत, उद्धव यांनी २०१४ पासून मनात असलेला सल बोलून दाखवला आहे.

२०१४ साली स्वतंत्र लढलेल्या शिवसेना, भाजपमध्ये राज्याच्या सत्तेसाठी मोठी स्पर्धा होती. भाजपनं शिवसेनेपेक्षा दुप्पट आमदार निवडून आणल्यानंतरही शिवसेनेच्या मदतीशिवाय त्यांना सरकार स्थापन करता येणे अशक्य होते. पण हिंदुत्ववादी भाजप सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत घेणार नाही, असा अंदाज बांधून शिवसेनेनं भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीनं भाजपला विनाशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला. त्यामुळं शिवसेनेला नाईलाजानं फार खळखळ न करता भाजपला पाठिंबा देणं भाग पडलं. तो सल उद्धव यांनी अग्रलेखातून बोलून दाखवला आहे. 'राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी तेव्हा फालतू काव काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते. 'केला तुका आणि झाला माका' अशी आज राष्ट्रवादीची स्थिती झाली आहे,' हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

'राजकारणात कधीकधी 'पदरी पडले पवित्र झाले' या धोरणानंही वागावं लागतं. मग कावळे काय, राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात युतीला जिथे गरज आहे, तिथं मावळ्यांचं स्वागत होईलच,' असंही उद्धव यांनी ठणकावलं आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !