२६ सप्टेंबरपासून पाच दिवस बँका बंद - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

23 September 2019

२६ सप्टेंबरपासून पाच दिवस बँका बंद


मुंबई - बँकांशी संबंधित असणारे कोणतेही काम असो...ते २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घ्या...कारण २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत देशभरातील बँका बंद राहणार असून, थेट ३० सप्टेंबरला बँका उघडणार आहेत. असे असले तरी, अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसल्याने ग्राहकांना थेट १ ऑक्टोबरला बँकांची पायरी चढावी लागणार आहे. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संपाची घोषणा केली असल्याने २६ आणि २७ सप्टेंबरला बँका बंद राहणार आहेत. तर, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनाकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बँकांचे कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत. २८ आणि २९ सप्टेंबरला शेवटचा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे पंचवीस सप्टेंबरनंतर बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. ‘ऑल इंडिया बँक ऑफसर्स कॉन्फेडरेशन’चे महामंत्री दिलीपसिंह चौहान म्हणाले,‘सातत्याने विरोध करूनही केंद्र सरकारने बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय बदलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाइलाजाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळे रोजगार घटण्याचे आणि थकीत कर्जांचे प्रमाण वाढणार आहे.’ केंद्र सरकार सार्वजनिक बँकांचे अस्तित्व नष्ट करण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप करून या आंदोलनामध्ये आम्ही अन्य संघटनांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही चौहान यांनी नमूद केले. या दोन दिवसीय संपामध्ये २८ सरकारी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

बँका सलग पाच दिवस बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम थेट एटीएम रोख रकमेविना कोरडीठाक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँका बंद असण्याचा सर्वांत मोठा फटका धनादेश वटण्याच्या प्रक्रियेला बसण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर रोजी बँकेत भरलेला धनादेश ३ ऑक्टोबरला वठण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरला भरलेला धनादेश वठण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरला सुरुवात होईल. सलग पाच दिवस बँका बंद राहणार असल्याने कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्तधारकांना पेन्शन मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. एक ऑक्टोबरला बँका उघडतील, मात्र त्या दिवशी गर्दी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे पुन्हा तीन ऑक्टोबरपासून बँकांमध्ये गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

पाच दिवस बँका बंद - 
२६ व २७ सप्टेंबर : विलीनीकरणविरोधात संप
२८ सप्टेंबर : चौथा शनिवार
२९ सप्टेंबर : रविवार
३० सप्टेंबर : अर्धवार्षिक हिशेब

Post Top Ad

test