शीतपेयांमुळे अकाली मृत्यूचा धोका


लंडन : दररोज दोन किंवा त्यापेक्षा अधिक शीतपेय रिचविणाऱ्या व्यक्तींना अकाली मृत्यूचा धोका अधिक असतो, असा दावा एका नवीन अभ्यासानुसार करण्यात आला आहे. साखर किंवा कृत्रिम साखरयुक्त शीतपेयांमुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतो. परिणामी, अकाली मृत्यूचा धोका वाढतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

युरोपियन देशांमधील जवळपास साडेचार लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्याचा आढावा घेत ब्रिटन व फ्रान्समधील संशोधकांनी यासंबंधीचे संशोधन सादर केले आहे. त्यानुसार जे लोक दररोज दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्लास साखर किंवा कृत्रिम साखरयुक्त शीतपेय पितात त्यांना महिन्यातून एक ग्लासपेक्षा कमी शीतपेय पिणाऱ्याच्या तुलनेत मृत्यूचा धोका अधिक असतो. कृत्रिम साखरयुक्त शीतपेयामुळे रक्ताभिसरणाशी संबंधित रोग तर साखरयुक्त शीतपेयामुळे पचनक्रियेशी रोग जडण्याचा धोका अधिक असतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यासाठी १९९२ ते २००० सालादरम्यानच्या आठ वर्षांच्या कालावधीत सहभागी झालेल्यांच्या खाण्या-पिण्याचे सर्वेक्षण संशोधकांनी केले. यानंतर सरासरी १६ वर्षांनंतर त्यांच्या आरोग्याचा आढावा घेऊन संबंधित निष्कर्षमांडण्यात आले. शीतपेय आणि मृत्यू यादरम्यानचे संबंध अधोरेखित करताना संशोधकांनी ही गोष्ट अधिक गुंतागुंतीची असल्याचेही म्हटले आहे; परंतु कमी शीतपेय पिणाऱ्यापेक्षा अधिक शीतपेय रिचविणाऱ्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे, असे संशोधनाच्या प्रमुख लेखकांपैकी एक असलेल्या नील मर्फी यांनी म्हटले. तर फक्त शीतपेय ही एकच बाब नसून, त्यापाठीमागे आणखी घटक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंबंधीचे सविस्तर संशोधन जेएएमए इंटर्नल मेडिसीन नामक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे.
Tags