मुंबई गॅस गळतीच्या चौकशीसाठी विशेष समितीमुंबई - उपनगरातील काही परिसरात वेगळा गॅससारखा वास येणाच्‍या तक्रारी नागरिकांकडून प्रशासनास दोन दिवसांपूर्वी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. या वेगळ्या वास येणाऱया तक्रारींच्‍या अनुषंगाने सर्वंकष कारणमीमांसा करण्‍यासाठी महापालिका प्रशासनाने आयआयटी, नीरीसह अन्‍य संस्‍थांची निवड केली आहे. तसेच घडलेल्‍या घटनांचा सखोल अभ्‍यास करण्‍यासाठी व भविष्‍यांत अशी घटना उद्भवू नये, म्‍हणून उपाययोजना करण्‍यासाठी एक विशेष समिती गठीत करण्‍याचे आदेश अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. अश्विनी जोशी यांनी आज एका विशेष बैठकीदरम्‍यान दिले.

मुंबई उपनगर काही परिसरामध्‍ये वेगळा वास येणाच्‍या पार्श्‍वभूमीवर विविध तेल व गॅस कंपन्‍यांची बैठक अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज (दिनांक २१ सप्‍टेंबर, २०१९) आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीदरम्‍यान संबंधित आदेश देण्‍यात आले आहेत. या बैठकीत महापालिकेचा आपत्ती व्‍यवस्‍थापन विभाग व मुंबई अग्निशमन दल, राष्‍ट्रीय केमिकल ऍण्‍ड फर्टीलायझर (आर.सी.एफ.), ‘डिश’, मुंबई पोलिस, महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल.), बी.पी.सी.एल., एच.पी.सी.एल. आदींचा समावेश असणाऱया विशेष समिती स्थापन करण्‍यात आली.

सर्व तेल व गॅस कंपन्‍यांना आपली यंत्रणा अधिक सर्तक ठेवण्‍याचे आदेश आजच्‍या बैठकीदरम्‍यान दिले. तसेच आज गठीत करण्‍यात आलेल्‍या समितीने घडलेल्‍या घटनेचा सर्वंकष अभ्‍यास आणि पुढे अशी घटना घडल्‍यानंतर काय उपाययोजना असावी, याचा सविस्‍तर आराखडा तयार करण्‍याचे व सदर आराखडा येत्‍या २६ सप्‍टेंबर, २०१९ रोजी होणाऱया समितीच्‍या पुढील बैठकीत सादर करण्‍याचे आदेश त्‍यांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रात अशा घटना घडल्‍यानंतर नागरिकांनी त्‍वरित महापालिकेच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणत्‍याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असेही आवाहन अश्विनी जोशी यांनी केले आहे.

गुरुवार, दिनांक १९ सप्‍टेंबर, २०१९ रोजी सायंकाळी व रात्री पश्चिम उपनगरातील काही परिसरातून; विशेषतः चेंबूर, गोवंडी, पवई, चांदीवली, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या भागातून महापालिकेच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागास ३४, व मुंबई अग्निशमन दलास २२ तर मुंबई पोलिसांना १०६ नागरिकांचे दूरध्‍वनी व सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून वेगळा वास येण्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. याबाबत मुंबई अग्निशमन दलाच्‍या ९ पथकांनी विविध भागात भेट देऊन शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाने देखील विविध तेल व गॅस कंपन्‍यांना याबाबत अवगत करुन त्‍यांच्‍या स्‍तरावर शोध घेण्‍याचे आदेश दिले होते.

बैठकीला उप आयुक्‍त (पर्यावरण) सुप्रभा मराठे, पोलिस खात्‍याचे उप आयुक्‍त प्रणय अशोक, महापालिकेच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, महापालिकेच्‍या प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्‍त, मुंबई अग्निशमन दल, बी.पी.सी.एल., टाटा पॉवर, एच.पी.सी.एल., बी.ए.आर.सी., आर.सी.एफ., आय.ओ.सी.एल., एन.डी.आर.एफ., एम.पी.सी.बी., एम.जी.एल., ओ.एन.जी.सी., एजिस लॉजिस्टिक या कंपन्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Tags