वर्षभरात ७६ हजार किलो प्लास्टिक जप्त, ४ कोटीचा दंड वसूल


मुंबई - मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशवी बंदी लागू झाल्यापासून मुंबईतून आतापर्यंत ७६ हजार २८२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. २३ जून २०१८ ते सप्टेंबर २०१९ पयॅत केलेल्या कारवाईतून ४ कोटी १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

राज्यभरात प्लास्टिकचा होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी राज्यभरात २३ जून २०१८ ला प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारच्या आदेशानंतर पालिकेने कठोर अंमलमजावणी सुरू करत प्लास्टिकविरोधात जोरदार मोहीम हाती घेऊन दंडात्मक कारवाईस सुरवात केली. ही मोहीम ठोसपणे राबविण्यासाठी मुंबई मनपातर्फे पालिकेचा परवाना विभाग, बाजार आणि दुकाने व आस्थापना विभाग यातील २५० अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासाठी २३ पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

ग्राहक किंवा दुकानदारांकडे प्लास्टिक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ते जमा केले जाते आहे. मुंबईत ६८ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे पालिकेने कार्यान्वित केली आहेत. त्यानुसार कारवाई सुरु आहे. मुंबई महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांचा साठा व वापराविरोधात दुकानदार, गाळेधारक यांच्याविरोधात कडक कारवाई मोहिम हाती घेतली. सर्व दुकानदार, मंडई, मॉल्समधील गाळेधारक, हॉटेल्स आणि हॉस्पिटलमध्ये कारवाई करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यास सुरुवात केली.

या कारवाईअंतर्गत २३ जून २०१८ ते १७ सप्टेंबर २०१९ या कालावधीत बाजार विभाग, दुकाने व आस्थापने आणि परवाना विभाग यांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत दुकाने, मॉल्स तसेच मंड्यांमधील गाळ्यांना भेटी दिल्या. त्यामध्ये ७६ हजार २८२ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला. तर ४ कोटी १३ लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दुकाने व आस्थापने विभागाने दिली आहे.
Tags