आंबेडकरांचा खरा रिपब्लिकन पक्ष हा आमचाच - आठवले

Anonymous

नागपूर दि. 6 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील खरा पक्ष हा आमचाच रिपब्लिकन पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा इतर कोणताही पक्ष नसून केवळ रिपब्लिकन पक्ष आहे. या रिपब्लिकन पक्षाचा 62 वा वर्धापन दिन येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी अकोला येथे साजरा करण्यात येईल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

मागील 2007 सालापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी मोठया उत्साहात रिपाइं तर्फे आम्ही साजरा करीत असतो. रिपाइंचे अनेक गट असले तरी आमचा रिपब्लिकन पक्ष दरवर्षी न चुकता रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो असे ना रामदास आठवले म्हणाले.नागपूर येथील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ विभागीय रिपाइं च्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर होते.नागपुरात मोठ्या प्रमाणात आज पाऊस असला तरी रिपाइं च्या विदर्भ विभागीय मेळाव्यास मोठया संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रिपाइंचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता हाती घेण्याचे संगीतले आहे. त्यानुसार सत्तेत सहभागी होण्याचे राजकारण आमच्या रिपब्लिकन पक्षाने यशस्वीरित्या केले आहे. विदर्भाच्या विकासाकडे पूर्वीचे सरकार लक्ष देत नव्हते त्यामुळे विदर्भाचा विकास झाला नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. असे आठवले म्हणाले.

विदर्भ विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात रिपाइं तर्फ़े आज 11 ठराव मंजूर करण्यात आले. त्यात स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे हा महत्वपूर्ण ठराव संमत झाला. तसेच गोसिखुर्द आणि निम्न पैनगंगा धरणाचे काम त्वरित पूर्ण करावे; नदी जोड प्रकल्प विदर्भात राबवावा; विदर्भात रिपाइंला विधान सभेच्या चार जागा द्याव्यात. अतिक्रमित गायरान पडीक जमीन कसणाऱ्या भूमिहीनांना द्यावी; झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या नावे जमीनीच्या मालकी हक्काचे पट्टे द्यावेत; डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक नागपूर मध्ये उभारण्यात यावे; बेरोजगारांना रोजगार द्या किंवा बेरोजगार भत्ता द्यावा; मागासवर्गीयांना पादोन्नतीमध्ये असलेली बंदी उठवावी तसेच खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे तत्त्व लागू करावे ; वाशीम येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करावे.मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांना निधी उपलब्ध करावा अश्या मागण्यांचे 11 प्रमुख ठराव आज रिपाइं च्या विदर्भ विभागीय मेळाव्यात मंजूर करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली.