खड्ड्यांवरून पालिका सभागृह तहकूब - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2019

खड्ड्यांवरून पालिका सभागृह तहकूब


मुंबई - गणेश विसर्जनापूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप खड्डेमय रस्ते कायम असल्याने खड्डयात कोल्डमिक्स वापरुनही खड्डे बुजले नाहीत. याचे पडसाद बुधवारी पालिका सभागृहात उमटले. गुरुवारी ११ दिवसांच्या गणरायाचे विसर्जनही खड्डेमय रस्त्यावरुन करावे लागणार आहे. यावेळी खड्ड्यात एखादा अपघात झाला तर त्याला प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदन करून स्थायी समिती यशवंत जाधव यांनी झटपट सभा तहकूबी मांडली. यापुढे खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स नको हॅाटमिक्सच हवे अशी मागणीही यावेळी सत्ताधा-यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स वापरण्यात आले. मात्र या कोल्डमिक्सने खड्डे भरलेच नाहीत. गणेशाचे आगमन व विसर्जनही खड्डे पार करीत करावे लागणार आहे. आतापर्यंत वापरण्यात येणा-या कोल्डमिक्सचा परिणाम काहीही झाला नसल्याचे समोर आले आहे. सगळीकडे रस्ते खड्डेमय झाले असून अनेकांना कसरत करून प्रवास करावा लागतो आहे. सद्यस्थितीत शहरातील बऱ्याच रस्त्यांत खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे अतोनात हाल होणार आहेत. त्यामुळे रस्त्यातील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे, याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महासभेत निवेदन केले. अशा खड्डेमय रस्त्यावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विचारत खड्डे बुजवण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाचा निषेध विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावेळी केला. विभागा - विभागातील रस्त्यावर पडलेल्या खडड्यांमुळे वाहतुक कोंडी व त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याचा पाढाच नगरसेवकांनी विचारला. कोल्डमिक्स नको हॅाटमिक्स वापरा अशी यापूर्वीच्या सभात अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांना जबाबदार कोण असा सवाल विचारत नगरसेवकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे चांगलेच वाभाडे काढले. दरम्यान प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ झटपट सभा तहकूबी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली व बहुमताने मंजूर झाली. गणरायाचे गुरुवारी विसर्जन होत आहे. यावेळी मिरवणुकीत रस्त्यातील खड्ड्यांत एखादा अपघात घडला तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल याकडेही जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

Post Bottom Ad