Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त


मुंबई - येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खबरदारची उपाययोजना म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अत्यंत महत्वाची पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून उत्पादन शुल्क अ विभाग मुंबई शहर यांनी फोर्ट मुंबई येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क,‘अ’ विभाग, मुंबई शहर व स्टाफ यांनी टाऊन हॉल, फोर्ट, मुंबई येथील परिसरात दुचाकीवरून बनावट विदेशी मद्य (स्कॉच)ची वाहतूक करताना आत्ताईल कुमारन हरीदासन या
इसमास महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये अटक करून माहिती घेऊन पुढील तापसाअंतर्गत त्याच्या गोडावून मध्ये व गोडावून समोर असलेल्या चारचाकी वाहनामध्ये लपवलेला विदेशी मद्यसाठा जप्त केला. सदर मद्यसाठयामध्ये ब्लॅक लेबल (3 बाटल्या), डबल ब्लॅक लेबल (1 बाटल्या), शिवास रीगल (1 बाटल्या), ग्लेनफिडीच (9 बाटल्या), कॅम्पेन कॅसल नॉट ब्रुट वाईन (9 बाटल्या), शार्दोनी ब्रुट वाईन (4 बाटल्या), कॅम्पेन पामेरी ब्रुट रॉयल वाईन (3 बाटल्या), कंपारी वाईन(90 बाटल्या), बकारडी व्हाईट रम (9 बाटल्या), स्मिर्नोफ वोडका (1 बाटल्या) अशा विविध ब्रॅंडच्या एकूण 130 बाटल्या ज्याची अंदाजे किमत रु.1,67,572/- अशी आहे. जप्त विदेशी मद्यासहित चारचाकी मारुती एसएक्स4 वाहन क्र. MH-43 V 4904 व दूचाकी होंडा अॅक्टिव्हा वाहन क्र. MH-01 AG 8775 असे एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत रु.5,87,563/- एवढी आहे. गुन्हा क्र 08/ए/2019 दि.09/9/2019 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. अटक इसमास मा.न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पुढील तपासकारिता पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तसेच फरार इसम महमद याचा शोध सुरू आहे.

सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेले विदेशी मद्य (स्कॉच)हे बनावट आहे. विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यामध्ये हलक्या प्रतीचे मद्य टाकून त्या बाटल्या विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन केले जाते की, अश्या प्रकारे अनधिकृत रित्या मद्य खरेदी करू नये. त्याने आरोग्यास अपाय होण्याची शक्यता आहे.मद्य हे शासन मान्य दुकानामधूनच खरेदी करावे. आपल्या संपर्कात अश्या प्रकारे बनावट मद्य विकणारी व्यक्ती आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी त्वरित संपर्क करावा.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom