ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध

Anonymous

मुंबई, दि. 6 : राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या किल्ल्यांचा वापर हॉटेलिंग किंवा लग्न समारंभासाठी होणार असल्याच्या बातम्या पूर्णत: निराधार आणि खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

शासनाने राज्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेल्या किंवा पडझड होत असलेल्या वर्ग २ दर्जाच्या किल्ल्यांचा हेरीटेज विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. गावागावात असलेल्या या किल्ल्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. आधीच्या सरकारच्या काळात या किल्ल्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. आता वर्ग २ दर्जाच्या या किल्ल्यांची देखभाल – दुरुस्ती, जतन-संवर्धन व त्यांचा पर्यटनदृष्ट्या हेरीटेज विकास करण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे. पण या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावत राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचे हेरीटेज हॉटेल किंवा लग्न कार्यालयामध्ये रुपांतरण करण्यात येणार असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांमधून प्रसारीत होत आहेत. राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशा कोणत्याही किल्ल्याचे हॉटेल किंवा लग्न कार्यालयामध्ये रुपांतरण करण्यात येणार नाही. हे किल्ले पूर्णत: संरक्षीत असून केंद्रीय पुरातत्व खात्याच्या निकषानुसार त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि गडकोट किल्ले हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे ऐतिहासिक मूल्य जपून त्यादृष्टीने या किल्ल्यांचा सर्वांगिण विकास राज्य सरकार करत आहे. तसेच या गडकोट किल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि ऐतिहासिक पावित्र्य जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य किल्ले वर्ग 2 मध्ये येतात. वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचे स्वतंत्र धोरण हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. असे किल्ले काळाच्या ओघात उध्वस्त होऊ नयेत, त्यांचा दुरुपयोग होऊ नये, त्यांचे संवर्धन करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करावी आणि पर्यटकांचा तेथे वावर वाढावा या हेतूने राज्य सरकारने या किल्ल्यांच्या हेरीटेज विकासासाठी धोरण आखले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.