चर्चगेट स्थानकात माकडाचा धुमाकूळ - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2019

चर्चगेट स्थानकात माकडाचा धुमाकूळ


मुंबई - चर्चगेट रेल्वेस्थानकात एका माकडाचा धुमाकूळ चालू असल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असताना प्रवाशांची पडझड होत आहे. गंभीर होण्यापासून ते सुदैवाने बचावत आहेत. मात्र असा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी (30 सप्टेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक माकड फलाट क्र. 1 च्या किनाऱ्यावर आरामात बसले होते. दुपारच्या वेळेस तुरळक प्रवासी असल्याने ते त्याच्या मर्कटलीला कुतुहलाने पाहत होते. त्याचवेळेस 1.52 वाजता विरारसाठी सुटणारी धीमी ट्रेन स्थानकात शिरली. माकडाचे त्या गाडीकडे लक्ष जाताच फलाटाच्या किनाऱ्यावरून त्याने मागे धाव घेतली. त्याचवेळी त्याच्या जोरदार धक्क्याने बाकड्यावर बसलेली महिला प्रवासी खाली पडली. तिच्या किंचाळण्याने तेथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी तिच्याकडे धाव घेतली. मात्र घाबरलेली ती महिला प्रवासी स्वतःला सावरत उभी राहिली. सुदैवाने ती जखमी झाली नाही. माकडानेही तेथून पळ काढला.
ही घटना कळताच एमआरएफचा जवान घटनास्थळी दाखल झाला. त्याने माकडाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माकड दिसल्यानंतर त्याच्याकडे पाहत राहण्याशिवाय तो काहीही करू शकला नाही. दरम्यान एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून माकड दररोज येथे येत आहे.

Post Bottom Ad