मध्य रेल्वेवरील राजधानी आठवड्यातून चार वेळा धावणार


मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-दिल्ली ही राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार वेळा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेणार आहे. राजधानी यापूर्वी आठवड्यातून दोन वेळच धावत असल्यामुळे मुंबई, नाशिककडून नवी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत आता आठवड्यातून चार वेळा राजधानी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

आगामी एक-दोन दिवसांत आणखी एक रॅक मिळणार आहे. त्यामुळे राजधानीच्या फेऱ्या वाढवणे शक्य होईल. दुसऱ्या गाडीलाही पुश-पूल इंजिन लावणार आहोत. यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागेल.राजधानीचा वेग कर्जत, कसारा घाटमाथ्यातून जातानाही कायम किंवा त्यापेक्षा जास्त राहावा, यासाठी दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात येणार आहे.

आठवड्यातून चार वेळा धावणार -
मध्य रेल्वे मार्गावर तब्बल २७ वर्षांनी मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस जानेवारीपासून सुरू झाली. मुंबईतीलच नव्हे, तर नाशिक, जळगाव आणि भोपाळमधील प्रवाशांची यामुळे चांगलीच सोय झाली होती. या एक्स्प्रेसच्या फेऱ्­या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. परंतु मध्य रेल्वेकडे एक गाडी उपलब्ध नसल्यामुळे एक्स्प्रेसच्या फेऱ्­या वाढवता येत नव्हत्या. एकाच गाडीद्वारे आठवड्यात फक्त दोन सेवा देणे शक्य आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन डब्ल्यूआरकडून अजून एक गाडी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढल्या १५ दिवसांत राजधानी एक्स्प्रेसच्या मुंबई-दिल्ली अशा दोन फेऱ्­या सुरू होणार आहेत..

मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्­या दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा, पनवेल मार्गावरील प्रवाशांची पश्चिम रेल्वेपर्यंत जाण्याची तारांबळ कमी होणार आहे. तसेच नाशिक आणि जळगाव येथून राजधानी मार्गस्थ होत असल्याने येथील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
Tags