पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ वाढणार


मुंबई - मालाड प्रभाग क्रमांक ३२ मधील कॉंग्रेसच्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवकपद जात पडताळणीमध्ये बाद झाल्याने दुस-या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका गीता भंडारी यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने किणी यांचे पद बाद ठरवले होते. या प्रभागात दुस-या क्रमांकाची मते शिवसेनेच्या गीता भंडारी यांना मिळाली होती. त्यामुळे आपल्याला नगरसेवक पद मिळावे याकरीता त्यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतली होती. लघुवाद न्यायालयाने भंडारी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ आता ९४ झाले आहे.

२०१७ च्या पालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक ३२ च्या कॉंग्रेस नगरसेविका स्टेफी किणी यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळले होते. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला किणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र नंतर उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली व स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद रद्ध करण्यात आल्याचा निकाल न्यायमूर्तींनी डिसेंबर २०१८ मध्ये दिला होता. या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना दुस-या क्रमांकाची मते मिळाली होती. दुस-या क्रमांकाच्या नगरसेवकाला संधी देण्याचा निर्णय हा लघुवाद न्यायालयाने घ्यायचा असतो. त्यामुळे नियमानुसार आपल्याला नगरसेवकपद मिळावे म्हणून गीता भंडारी यांनी लघुवाद न्यायालयात तसा दावा दाखल केला होता. नुकताच न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

या निर्णयामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ ९४ झाले आहे. शिवसेनेचे ८५ नगरसेवक असून ३ अपक्षांचा पाठिंबा अधिक मनसेतून आलेले ६ नगरसेवक असे ९४ इतके संख्याबळ शिवसेनेचे होते. मात्र नगरसेवक सगुण नाईक यांचे पद रद्द ठरल्यामुळे ही संख्या ९३ झाली आहे. दरम्यान, गीता भंडारी यांना नगरसेवक पद मिळाल्याची घोषणा पालिका सभागृहात झाल्यानंतर शि़वसेनेचे संख्याबळ ९४ होईल.