Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अधिकाधिक मतदान करून महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून द्या - नरेंद्र मोदी


मुंबई - महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. मतदारांनी अधिकाधिक मतदान करून महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या विराट जाहीर सभेत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रेल्वे मंत्री पीयुष गोयल, भाजपा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्रातील आणि राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारांनी अनेक जनकल्याणकारी निर्णय घेतले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कार्यक्षम आणि प्रामाणिक सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने सामान्य माणसाचे जीवन सुखकर कसे होईल, या साठी अनेक योजना आखल्या आहेत. सामान्य माणसांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले आहे. काँग्रेसने सरकार चालविताना सामान्य माणसाच्या हिताचा कधीच विचार केला नाही. सामान्य माणूस आपला कायमचा आश्रित कसा राहील यासाठीच काँग्रेसने प्रयत्न केले. भाजपाने लोकसहभागातून सरकार कसे चालवावे याचा आदर्श घालून दिला आहे, असे ते म्हणाले.

मुंबईत १९९७ मध्ये मेट्रो सुरु करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारने मुंबईत मेट्रो सेवा सुरु करण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष केले. ट्रान्स हार्बर लिंक योजनेकडेही काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. या योजना वेळीच पूर्ण केल्या असत्या तर मुंबईतील सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन अधिक सुखकर झाले असते. फडणवीस सरकारने या योजना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती दाखविली. या योजना लवकरच पूर्ण होतील आणि मुंबईकरांची अनेक समस्यांतून मुक्तता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईसारख्या महानगरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना अनेक सामान्य माणसाची फसवणूक होते, हे ओळखून आमच्या सरकारने ' रेरा ' कायद्याची निर्मिती केली. रेरा कायद्यामुळे बिल्डर माफियांना आला घातला गेला आहे.

मुंबईत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यात येत आहे. या बाबत विरोधकांकडून अफवा पसरवत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. न्यायालयाकडून लवकरच परवानगी मिळेल आणि शिवस्मारकाचे काम पूर्ण होईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर दहशतवाद्यांचे लक्ष्य बनले होते. या महानगरात अनेकदा दहशतवादी हल्ले झाले. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने या हल्ल्यांच्या पाठीमागे असलेल्या परकीय शक्तींवर कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. आमच्या सरकारने मात्र दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या शक्तींना धडा शिकविला. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक च्या माध्यमातून दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या शक्तींना धडा शिकविला. यामुळेच आता मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची हिम्मत कोणी दाखवू शकणार नाही.देशाची सुरक्षा, अखंडता, एकात्मता लक्षात घेऊन आमच्या सरकारने घटनेतील ३७० वे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कलमामुळे काश्मीरमध्ये फुटीरतावादी शक्तींना आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळत होते. घटनेतील ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाला काही विरोधकांनी विरोध केला. अशा विरोधकांना मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने मुंबईतील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेचे अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लावले आहेत. मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड या सारख्या प्रकल्पांद्वारे मुंबई महानगराचा चेहरामोहरा बदलण्याचे आमचे स्वप्न आहे. दुष्काळमुक्त, रोजगार युक्त महाराष्ट्र निर्माण करून नवभारताच्या निर्मितीला आम्ही साथ देत आहोत. या विकास कामांच्या आधारावर आम्ही मते मागत आहोत, असेही मा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom