आदित्य ठाकरेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट


मुंबई - शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आज आपला अर्ज भरला. हा अर्ज भरण्याआधी वरळी मतदार संघातून रॅली काढली. या रॅलीत चोरटयांनी चांगलाच हात साफ केला. अनेक शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांचे मोबाइल, पैसे, सोन्याच्या चैन चोरट्यांनी चोरून नेल्या. विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांनाही याचा फटका बसला आहे. 

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रचार रॅली १० च्या सुमारास निघाली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. वरळी परिसरात वाजत-गाजत आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. याच गर्दीचा फायदा काही चोरट्यांनी घेत, गर्दीतून अनेकांचे मोबाइल लांबवले. तर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्याही लांबवल्याचा प्रकार पुढे आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीतून चोरट्यांनी तब्बल १३ सोनसाखळ्या चोरल्याचं कळतं. तर १२ जणांचे मोबाइल चोरीला गेले आहेत.या चोरट्यांनी कार्यकर्तेच नव्हे तर शिवसेना नेत्यांनाही सोडलं नाही. वरळी परिसरातील शिवसेना विभागप्रमुख व नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचे ४० हजार चोरीला गेल्याचं वृत्त आहे. मात्र पोलिस ठाण्यात अद्याप कुणीही तक्रार केली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Previous Post Next Post