शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्रिपदे - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

30 October 2019

शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि १३ मंत्रिपदेमुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिलेले नाही. त्यातच मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना आग्रही आहे. असे असतानाच भाजपनं शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदे देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपनं ठेवला असल्याचं कळतं. तर मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील, असंही समजतं. भाजपच्या या 'ऑफर'नंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपनं १०५ जागा जिंकल्या असून, अन्य पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ११० पर्यंत पोहोचलं आहे, तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला असून, त्यांनाही अन्य पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ६१ वर पोहोचलं आहे. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बळ मिळू शकलं नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेना युती होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच हा तिढा सोडवण्यासाठी भाजपनं शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळं शिवसेना नक्की कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपनं विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.

Post Top Ad

test