Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला मुंबईत धारावी येथे प्रचार सभा



मुंबई - येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी स्फूर्ती आणण्यासाठी, काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार राहुल गांधी रविवार दि. १३ ऑक्टोबर २०१९ मुंबईत प्रचारसभा करणार आहेत. मुंबईतील धारावी येथे सायंकाळी ४ वाजता या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रचारसभेच्या माध्यमातून काँग्रेसचे विकासाचे मुद्दे सामान्य जनतेसमोर पोहचवणार आहेत, तसेच विरोधकांचाही समाचार घेणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत दिली. एकनाथ गायकवाड पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी या देखील मुंबईचा दौरा करणार आहेत. तसेच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देखील मुंबईमध्ये पाचारण करणार असल्याचा मुंबई काँग्रेसचा विचार असल्याचे एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. 

एकनाथ गायकवाड पुढे म्हणाले की, आज १७ दिवस झाले, तरी आज पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही. आज त्यांचे स्वतःचे पैसे ते काढू शकत नाहीत. केंद्र सरकार आपले हात झटकत आहे. आज मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि मुंबई काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांनी आरबीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील (Writ Petition) केली आहे.

या पत्रकारपरिषदेत विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा यावेळेस म्हणाले की, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकारपरिषदेत त्या म्हणाल्या की, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्या आज आरबीआय गव्हर्नरची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. कारण पीएमसी बँक ही सहकारी बँक आहे व सहकार क्षेत्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही, आरबीआयचे त्यावर नियंत्रण असते. या पत्रकारपरिषदेत निर्मला सीतारामन यांनी पीएमसी बँकेच्या १६ लाख खातेधारकांचे पैसे कधी मिळणार. यावर कोणतेही भाष्य केले नाही. या १६ लाख खातेधारकांचे काय? मी सुद्धा या बँकेचा खातेधारक आहे. स्वतःच्या जबाबदारीपासून केंद्र सरकार पळू शकत नाही. माझे निर्मला सीतारामन यांना सांगणे आहे की, आरबीआय जरी स्वतंत्र संस्था असली, ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आज तुम्ही पंजाब नॅशनल बँक, SBI सारख्या बँकांना रिव्हायवल पॅकेज जाहीर करता. पीएमसी बँक ही सहकारी बँक असली तरी मोठी बँक आहे. या बँकेचे १६ लाख खातेधारक आहेत. दीड हजार क्रेडिट सोसायट्यांची खाती यात आहेत. आज १७ दिवस झाले हे १६ लाख खातेधारक स्वतःच्या पैशांसाठी ठिकठिकाणी फिरत आहेत. भाजप सरकारला आरेची झाडे तोडायची होती ती त्यांनी दोन दिवसांत तोडली. आज १७ दिवस झाले तरी या १६ लाख खातेधारकांचा सरकार विचारसुद्धा करत नाही. म्हणून याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील (Writ Petition) केलेली आहे अशी माहिती चरणसिंग सप्रा यांनी दिली.

या पत्रकारपरिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, तसेच जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom