महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल - मुख्यमंत्री


मुंबई - भारतीय जनता पक्ष- शिवसेना, रिपब्लिकन, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती यांच्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केला.

भाजप - शिवसेनेतर्फे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले. भाजप शिवसेना युती ही हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित आहे.महायुतीतील सर्व घटक पक्ष व्यापक वैचारिक भूमिकेतून एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीचे जागावाटप करताना आम्ही सर्व घटक पक्षांनी तडजोड केली आहे. भाजप १५०, शिवसेना १२४ तर अन्य घटक पक्ष १४ जागा लढविणार आहेत. जागावाटपावरून काही ठिकाणी नाराजी असली तरी दोन दिवसांत सर्व बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळेल. 

आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासाला गती दिली. पुन्हा सत्तेवर आल्यावर आम्हाला राज्यातील दुष्काळी भागाला पाणी पुरवठा करून सुजलाम सुफलाम करायचे आहे. आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.