`स्वच्छ भारता`साठी स्वच्छतादूत रस्त्यावर


मुंबई - महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मुंबईसह देशभरात आणि परदेशातही साजरी होत असताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अवघा सोशल मीडिया महात्मा गांधीमय झाला होता. गांधीजींच्या विचारांची व शिकवणुकीची उजळणी केली जात होती. स्वच्छता हा गांधीजयंतीनिमित्तचा मुख्य कार्यक्रम झाला होता. मुंबईत स्वच्छतेबाबतचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 पासून `स्वच्छ भारत`चा संदेश घराघरात पोहोचवायला सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 जानेवारी 2015 पासून स्वच्छ भारत संकल्पनेतील स्वच्छ महाराष्ट्र योजना राज्यभर पसरवली. मुंबई महापालिकेनेही स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ भारत योजनेला चांगलेच सहकार्य केले. तेव्हापासून स्वच्छ भारत हे अभियनच झाले आणि सर्व नागरिकांनी त्याचे कटाक्षाने पालन करण्यास सुरुवात केली.

सध्या नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र देवीचा (लक्ष्मीचा) जागर सुरू आहे. हात फिरे (स्वच्छता) तेथे लक्ष्मी वसे अशी म्हण आहे. तसेच स्वच्छता हेच देवाचे दुसरे घर असे मनावर बिंबवले जाते. त्याचा जनमानसावर चांगला परिणाम होत असून स्वच्छता हे अभियान झाले आहे. त्याचेच प्रतिबिंब बुधवारी (2 ऑक्टोबर) गांधी जयंतीच्या कार्यक्रमात उमटले.

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. यासाठी प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रमही राबवण्यात आले. यात कॉलेज, सामाजिक संघटना, प्लास्टिकमुक्तीसाठी काम करणाऱ्या संघटना यांचा सहभाग होता.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंस्वकांनी मुंबईभर स्वच्छता मोहीम राबवली. विशेषकरून रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ राखण्याला विशेष महत्त्व दिले. रेल्वेच्या स्वच्छता पंधरवड्यात तब्बल १० लाखांहून अधिक स्वच्छता दूतांनी सहभाग घेतला होता. या पंधरवड्यात पश्चिम रेल्वेवरील एकूण १०९.३८ टन प्लास्टिक कचरा उचलण्यात आला होता. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे मंत्रालयाने शून्य प्लास्टिक वापरण्याचा निर्णय घेत याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व रेल्वे स्थानकांना दिले. रेल्वे स्थानकांवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. त्याच्या परिणामी बुधवारी सर्व स्टेशनच्या परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक स्वच्छता मोहीम राबवताना दिसत होते.

स्वच्छतेच्या जनजागृतीची 'लोकल' -
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता विषयाचे संदेश चित्रीत करण्यात आलेल्या लोकल सीएसएमटी-ठाणे आणि सीएसएमटी-वाशी स्थानकादरम्यान चालवण्यात आल्या. महात्मा गांधी यांचे चित्रप्रतिमा रेखाटलेले रेल्वे इंजिन मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसला जोडण्यात आले.

निरामयचा स्वच्छता संदेश -
निरामय हेल्थ फाऊंडेशन आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुलुंड यांच्या वतीने दादर सेंट्रल रेल्वे स्टेशन येथे पोषण आणि सामाजिक स्वच्छता या विषयावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये पथनाट्य, रॅली आणि इतर कार्यक्रम सादर करण्यात आले. निरामय हेल्थ फाऊंडेशन माता व बाल संगोपन यासंबंधी विविध उपक्रम मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या १८ वर्षांपासून राबवते. जनजागृती आणि पालकांचे प्रशिक्षण याद्वारे आपण लहान मुलांच्या कुपोषणावर मात करू शकतो, असे मत निरामय संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. क्षमा निकम यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी निरामय संस्थेचे स्वप्नील विचारे, दीप्ती गुळवे आणि सह कर्मचारी तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या स्वाती ठोंबरे आणि त्यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.

वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम -
महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्सेवा बीच स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.या मोहिमेत सीआरपीएफ जवानांसोबत मुंबईतील विविध संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी तीन तास वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम राबविली.

महापालिकेतर्फे प्लास्टिकविरोधात मोहीम -
महापालिकेच्या सर्व विभागात प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधन करणे, त्या अनुषंगाने शपथ घेणे, स्वच्छता मोहीम असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

खार रेल्वे ब्रिज सेक्शन येथील, गोळीबार रोड येथील फेरीवाल्यांनी आम्ही प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही अशी शपथ घेतली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने वर्सोवा, जुहू आणि गिरगगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली. त्यामध्ये 10 हजार नागरिकांनी भाग घेतला.

खासगी 50 शाळा आणि महापालिकेच्या 80 शाळांमधून विद्यार्थी आणि शिक्षकांनी रॅली काढून प्लास्टिकविरोधात जनजागृती केली. तर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रहिवासी वसाहती आणि बाजारात फिरून प्लास्टिक जमा केले. सहायक आयुक्तांनी तर जनजागृतीसाठी 40 सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. कालिना येथे तर मुंबई विद्यापीठाच्या 500 विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत प्रबोधन केले.

महापालिकेचे स्वच्छता अभियान
* 55 ठिकाणाी स्वच्छतेचे कार्यक्रम साद करण्यात आले.
* 200 हून अधिक ठिकाणी रहिवाशांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली.
* सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वच्छता अभियांनात सहभाग नोंदविला
Tags