Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महाराष्ट्र प्रसारमाध्यम अधिनियम राज्यात लागू


मुंबई दि. २५ : राष्ट्रपती यांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती, प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) करणारा अधिनियम २०१७ संपूर्ण राज्यात ८ नोव्हेंबर २०१९ पासून लागू करण्यात आला आहे. तो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्याच तारखेला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जो कोणी या अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून हिंसाचाराचे कोणतेही कृत्य करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल किंवा करण्यास अपप्रेरणा किंवा चिथावणी देईल किंवा त्यास प्रक्षोभित करील अशा कोणत्याही अपराध्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे.

दखलपात्र आणि अजामीनपात्र -
पोलीस उप अधीक्षक पदाच्या दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखाली अपराधाचा तपास करू शकेल आणि या अधिनियमाखालील केलेला कोणताही अपराध हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल तो प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून न्यायचौकशी योग्य असेल. या अधिनियमाखालील केलेल्या कोणत्याही अपराधामध्ये न्यायालयाने दिलेल्या शिक्षेव्यतिरिक्त मालमत्तेचे नुकसान झाल्यास झालेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल न्यायालयाने निर्धारित केलेली नुकसान भरपाई देण्याचे दायित्व अपराध्यावर असेल व त्याला प्रसारमाध्यमातील व्यक्तीने केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देखील करावी लागेल. या अधिनियमाखाली अपराध सिद्ध झालेल्या अपराध्याने त्याच्यावर लादलेली नुकसानभरपाई किंवा वैद्यकीय खर्च दिला नाही तर ती रक्कम जमीन महसूलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल.

अधिनियमातील तरतूदींचा गैरवापर केल्यास -
जी कोणी प्रसारमाध्यमातील व्यक्ती या अधिनियमाच्या तरतूदींचा हेतुपुरस्सर गैरवापर करील किंवा दुष्ट प्रयोजनासाठी त्याचा वापर करील किंवा या अधिनियमाखाली खोटी तक्रार करील अशा व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रसारमाध्यमातील व्यक्तीचा अशा पद्धतीने अपराध सिद्ध झाल्यास प्रसारमाध्यमातील व्यक्ती म्हणून ती व्यक्ती कोणतेही शासकीय लाभ मिळवण्यास हक्कदार नसेल, त्याची अधिस्वीकृती पत्रिका कोणतीही असल्यास ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.

विविध संकल्पनांची स्पष्टता -
या अधिनियमात प्रसारमाध्यम संस्थेचा अर्थ स्पष्ट करण्यात आला असून यात कोणतीही नोंदणीकृत वृत्तपत्र आस्थापना, वृत्तवाहिनी आस्थापना, वृत्तांकन आधारित इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम आस्थापना किंवा वृत्तकेंद्र आस्थापना यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमातील व्यक्ती याचा अर्थ स्पष्ट करताना अधिनियमात म्हटले आहे की, ज्या व्यक्तीचा प्रमुख व्यवसाय पत्रकाराचा असेल आणि जी एक किंवा अधिक प्रसारमाध्यम संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या संबंधात नियमित किंवा कंत्राटी तत्वावर पत्रकार म्हणून नियुक्त केली गेली असेल अशी व्यक्ती म्हणजे प्रसारमाध्यमातील व्यक्ती होय. यामध्ये संपादक, वृत्तसंपादक, उप संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांचा समोवश आहे. व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय नात्याने नेमलेली किंवा पर्यवेक्षकीय नात्याने नेमलेली व तसे कार्ये पार पाडणाऱ्या व्यक्तीचा यात समावेश होणार नाही.

अपराधी कुणाला म्हणायचे -
या अधिनियमात वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आस्थापना या सर्व संकल्पना जशा स्पष्ट करण्यात आल्या आहेत तसेच या अधिनियमाखाली अपराधी कुणाला संबोधायचे याचा अर्थही सांगण्यात आला आहे. या अधिनियमाखाली हिंसाचाराचे कृत्य करील, ते करण्याचा प्रयत्न करील किंवा ते करण्यास अपप्रेरणा देईल किंवा चिथावणी देईल किंवा त्यासाठी प्रक्षोभित करील अशी कोणती ही व्यक्ती या अधिनियमाद्वारे अपराधी ठरणार आहे.

या अधिनियमाची निर्दोष पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक असलेल्या इतर संकल्पनांची स्पष्टता यात करण्यात आली आहे जसे की मालमत्ता म्हणजे काय त्याचा अर्थ, हिंसाचार कशास म्हणावयाचे, या सर्व बाबी या अधिनियमात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom