साध्वी प्रज्ञा सिंह यांची संसदेच्या संरक्षणविषयक समितीवरून हकालपट्टी


नवी दिल्ली - भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत नथुराम गोडसेला पुन्हा देशभक्त म्हटले आणि त्यानंतर एकच गदारोळ माजला. या पार्श्वभूमीवर साध्वी प्रज्ञा यांच्यावर भाजपने कठोर कारवाई करत त्यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवरून हकालपट्टी केली आहे. पक्ष त्यांच्यावर इतका नाराज आहे की त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. 

बुधवारी संसदेत डीएमके खासदार ए. राजा यांच्या भाषणादरम्यान त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे असा उल्लेख केला, त्यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देशभक्तांचा उल्लेख करू नका असं म्हटलं. नंतर प्रज्ञा सिंह यांचं हे वाक्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आलं. प्रज्ञा यांनी नंतर झाल्या प्रकारावर स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला होता. 'गोडसे नव्हे तर उधम सिंह यांचा उल्लेख आल्यावर आपण ए. राजा यांना थांबवलं होतं,' असं त्या म्हणाल्या.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारच्या या संसदेतील प्रकारानंतर प्रज्ञा यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीवरून हटवण्याची शिफारस केली. त्यांनी प्रज्ञा यांचं विधान अस्वीकारार्ह म्हणत त्यावर नाराजी व्यक्त केली. पक्ष कधीही अशा विधानांचे समर्थन करू शकत नाही, असं नड्डा म्हणाले. अधिवेशनाच्या वेळी भापजच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतली प्रज्ञा यांना उपस्थित राहता येणार नसल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं.
Previous Post Next Post