Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आपत्ती मदत कार्यासाठी हवाई दल सदैव सज्ज


मुंबई - नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अश्या कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. आपत्ती काळात स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर मदत यंत्रणाबरोबर उत्तम समन्वय, संवाद असणे महत्त्वाचे आहे, असे मत एअर फोर्स स्टेशनचे विंग कमांडर ए. श्रीधर यांनी व्यक्त केले.

सांताक्रूझ येथील हवाई दलाच्या बेस स्टेशनच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनातील मानवी मदत कार्य या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होता.यावेळी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अभय यावलकर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांच्यासह हवाई दल, नौदल, बृहन्मुबई महापालिका, ठाणे महापालिका, कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष व केंद्रीय आपत्ती निवारण दल, अग्निशामक दल, आदी विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रीधर म्हणाले की, गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी. हवाई दल आपत्ती काळात मदतीसाठी नेहमी सज्ज असून आपत्तीची माहिती मिळाल्यानंतर काही वेळेत मदत पोचविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात आहेत. आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲप सारख्या समाजमाध्यमांचा योग्य उपयोग करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावलकर म्हणाले की ,राज्यातील आपत्ती नियंत्रणासाठी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहे. कोणत्याही भागात आपत्ती निर्माण झाली तर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यरत आहे. पूरपरिस्थितीमध्ये लोकांची मागणी आणि विविध दलांना लागणारी साधन सामुग्रीसाठी केंद्र शासन आणि विविध दलाच्या प्रमुखांनी तात्काळ मदत केली त्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार मानले. 

यावेळी स्कोड्रन लीडर प्रतिक बुऱ्हाणपूर व स्कोड्रन लीडर संदीप पवार यांनी हवाई दलाने वेगवेगळ्या आपत्ती काळात केलेली कामे, या काळात कशा पद्धतीने यंत्रणा राबविण्यात आली या संबंधीचे सादरीकरण केले. या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस, सांगली-कोल्हापुरातील पूर परिस्थिती आदी काळात हवाईदल, लष्कर, नौदल, कोस्ट गार्ड, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण पथक, स्थानिक प्रशासन यांची टीम बचाव कार्यासाठी चोवीस तास कार्य करत होती. यावेळेचा अनुभव या कार्यशाळेत सांगण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom