Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गारगाई धरण - जमीन संपादनासाठी 148 कोटी रुपये मंजूर


मुंबई, दि. 2 (प्रतिनिधी) ः मुंबईकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या नव्या तीन धरण प्रकल्पांपैकी गारगाई धरणासाठी खासगी जमीन ताब्यात घेण्यासाठी सुधार समितीने 148 कोटी रुपये खर्चाला शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे धरणाच्या कामकाजाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.
सध्या मुंबईला प्रतिदिन 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गारगाई धरण झाल्यानंतर त्यापासून दररोज 440 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. या धरणासाठी 619 कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.

मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३९५८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मुंबईचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राध्यान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये या प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेतली जाणार आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला महाराष्ट्र शासनाच्या १२/११/२०१३च्या निर्णयानुसार परवानगीही मिळाली आहे.

भूसंपादन कक्ष स्थापन
पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा असे एकूण तीन नवीन जलप्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. या तीन प्रकल्पांतून मुंबईकरांसाठी प्रतिदिन २८९१ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करण्यासाठी विशेष भूसंपादन कक्ष पालिकेने याआधीच सुरू केला आहे.

पालघर जिल्ह्यात प्रकल्प
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २ किमी लांबीच्या बोगद्याचे काम केले जाणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून मुंबईला पुरवण्यात येणार आहे.

840 हेक्टर क्षेत्राचा वापर
गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे ४२४ हेक्टर खासगी जमीन वाटाघाटींद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजित खर्च १४७.७९ कोटी असून हा प्रस्ताव सुधार समितीने मंजूर केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom