AD BANNER

अनधिकृत पार्किंग - ३९ अवजड वाहनांसह १३६ वाहनांवर पालिकेची कारवाई


मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुलभ व वेगवान व्हावी यासाठी पालिकेने अनधिकृत पार्किंगवरील कारवाईचा धडाका पुन्हा सुरु केला आहे. या कारवाई अंतर्गत १८ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसांत १३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत ८ लाख ८९ हजार ४३५ एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर वाहनांमध्ये ३९ अवजड वाहने, ७९ चार चाकी वाहने, ५ तीन चाकी वाहने आणि एका दुचाकीचा समावेश आहे.

महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात आढळून येणा-या अनधिकृत पार्किंगवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत गेल्या तीन दिवसांत ८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७९ चार चाकी, ५ तीन चाकी व एका दुचाकीचा समावेश आहे. या कारवाईपोटी ६ लाख १३ हजार ६३५ रुपये एवढी दंड रक्कम महापालिकेकडे जमा झाली आहे. तसेच ५ महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगवर आलेल्या कारवाईत दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या महत्त्वाच्या रस्त्यांच्या भागांचा समावेश आहे. या परिसरात १२ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ७५ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेली सर्व वाहने चार चाकी वाहने आहेत.

शिवाय अनधिकृतपणे उभ्या करण्यात आलेल्या बसेस व अवजड ३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये ३८ बस गाड्या व एका ट्रकचा समावेश आहे. या कारवाईत २ लाख ८०० रुपये एवढी रक्कम दंड स्वरुपात वसूल झाली आहे.
Previous Post Next Post