बंद क्रीडा भवन सुरू करण्यासाठी प्रस्ताव - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 November 2019

बंद क्रीडा भवन सुरू करण्यासाठी प्रस्ताव


मुंबई - महापालिका कर्मचा-यांच्या कला -गुणांना वाव मिळण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात सुरु झालेल्या पालिकेच्या सीएसटी व शिवाजी पार्क येथील क्रीडा भवन मागील नऊ वर्षांपासून बंद आहे. ही क्रीडा भवन पुन्हा सुरू करावीत यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने आता राजकीय पक्ष व पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. क्रीडा भवन त्वरीत सुरू करण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या समितीत मंजूर करून पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनीही ते आम्हाला चालवण्यास द्यावे, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.

मुंबई महापालिकेने १९२६ मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली. या क्रीडा भवनात पालिका कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा, क्रीडा महोत्सव आयोजित केले जात होते. क्रीडा भवनच्या अनेक कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सन २०१० मध्ये क्रीडा भवनाच्या कार्यकारणीतील काही सदस्यांवर झालेल्या गैरकारभाराच्या आरोप झाल्यानंतर या क्रीडा भवनला टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर या क्रीडा भवनाच्या कारभाराची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही क्रीडा भवन पुन्हा सुरू करावे करण्याबाबतच्या पालिकेकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. क्रीडा भवनाची एक वास्तू पालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानलगत असून दुसरी वास्तू शिवाजी पार्क येथे आहे. तसेच विविध रुग्णालये, मुद्रणालय, गॅरेज व विभाग कार्यालय येथे एकूण ३२ क्रीडा केंद्र आहेत.

क्रीडा भवनाचे सुमारे सात हजार सदस्य असून दोन हजार आजीव सदस्य आहेत. क्रीडा भवनाचे पदसिद्ध अध्यक्ष स्वत: पालिका आयुक्त आहेत. भवनाच्या पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दोन्ही क्रीडा भवनाच्या इमारतींना टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडा भवनाचा मागील नऊ वर्षाचा ताळेबंद नफा-तोटा, मुदत ठेवीबाबत निर्णय होऊ शकलेला नसून सेवानिवृत्त कामगारांची देणीही अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. ही संस्था वाचवण्यासाठी तसेच चालवण्यासाठी पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुनील परब, महादेव गोळवसकर, राजेश मुदम, सुधीर शेंडे जबादारी स्विकारण्यास तयारी दर्शवली आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर क्रीडा भवनाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी जबाबदारी द्यावी असा आग्रह गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

Post Bottom Ad