Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती


मुंबई - राज्यातील सत्तापेच अखेर सुटला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सहमती झाली असून उद्या संयुक्त पत्रकार घेऊन त्याबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. तब्बल सव्वा दोन तासांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आघाडीचं सरकार कोणत्या मुद्द्यावर चालेल यावर संपूर्ण चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांचं ड्राफ्टिंग सुरू आहे, असं सांगतानाच आजच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा कोणताही संशय नाही. उद्धव यांच्याच नेतृत्वावर सर्वांची सहमती झाली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा आणि मुख्यमंत्रिपदाचा विषय निकाली निघाला आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याने उद्या तिन्ही पक्ष एकत्रित येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देण्यात येईल, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

आज पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले आणि चर्चा केली. चर्चा योग्य दिशेने सुरू असून ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली आहे. बऱ्याच गोष्टींवर आम्ही मार्ग काढले आहेत. मात्र चर्चा अद्याप सुरू असल्याने तुम्हाला कोणतीही अर्धवट माहिती देता येणार नाही. लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला त्याबाबतची माहिती देऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आदी नेते बैठकीतून बाहेर पडले आहेत. तसेच काँग्रेसच्या इतर नेत्यांची अजूनही चर्चा सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom