‘हे माझं सरकार’ अशी भावना जनतेच्या मनात निर्माण व्हावी - मुख्यमंत्री - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2019

‘हे माझं सरकार’ अशी भावना जनतेच्या मनात निर्माण व्हावी - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 29 : ‘हे माझं सरकार ’ अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण व्हावी असे काम करा. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालय प्रवेशासाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन फुलांनी सजविण्यात आले होते. प्रवेशाप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या महिला अधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. शाहू छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री  ठाकरे यांचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी आदींनी प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विविध विभागांच्या सचिवांशी संवादही साधला. ‘राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाची जोड मिळाल्यास प्रगती होते. त्यामुळे जनतेच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असेही आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

Post Bottom Ad