AD BANNER

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव याची वर्णी ?


मुंबई - येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणा-या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पालिकेत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या पदासाठी अनेकजण स्पर्धेत असले तरी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या निवडणुकीत संधी हुकलेले मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, बाळा नर, रहाटे यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक स्पर्धेत असल्याने जोरदा चुरस होणार आहे. 
 
मुंबईसह आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांचा महापौर खुल्या वर्गातून निवडला जाणार आहे. मुंबई महापालिकेत सद्या शिवसेनेचे सर्वाधिक ९४ नगरसेवक आहेत. पालिकेत शिवसेनेची सत्ता असली आणि सध्याच्या बलाबलाप्रमाणे महापौर शिवसेनेचा होणार असला तरी या निवडणुकीवर सध्याच्या राजकारणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदावरून युतीत बिनसले असले तरी युती अजूनही तुटली असे दोन्हीकडूनही सांगण्यात आलेले नाही. पूर्वीच्या राजकारणाप्रमाणे शिवसेनेला पालिकेत भाजपची साथ आहे. तीच सोबत महापौरपदाच्या निवडणुकीतही राहील. पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेऊन राज्याचे राजकारण हाकायचे ठरवल्यास त्याचे पडसाद महापौर निवडणुकीत उमटतील. काँग्रेस-राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांची साथ घेऊन शिवसेनेच्या नाकीनऊ आणण्याची रणनीती भाजपकडून आखली जाऊ शकते. मात्र पक्षाकडून आदेश नसल्याने सद्या उघडपणे कोणीही बोलायला तयार नाही. महापौरपदासाठी गुरुवार २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सोमवार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर महापौरपदासाठी कोणाची कशी रणनीती आखली जाणार आहे हे स्पष्ट होईल. सद्या पालिकेतील बलाबलनुसार शिवसेनेचे सर्वाधिक ९४ नगरसेवक असल्याने शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचे चित्र आहे. या पदासाठी शिवसेनेतून यशवंत जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव हे तिन टर्म पासून नगरसेवक आहेत.

याआधी जाधव यांचा २००२ साली तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचा २०१४ साली महापौर बनण्याची संधी थोडक्यात हुकली होती. दोन्ही वेळेला अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले असताना जाधव दाम्पत्याला संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे यावेळेला खुल्या वर्गाचे आरक्षण असताना देखील जाधव यांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यशवंत जाधव यांनी आतापर्यंत बाजार समितीचे आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. आधी गटनेते आणि २०१७ साली त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली होती. २०१८ साली त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

महापालिकेतील बलाबल
शिवसेना- ९४
भाजप- ८३
काँग्रेस- २९
राष्ट्रवादी- ८
समाजवादी- ६
एमआयएम- २
मनसे- १
Previous Post Next Post