AD BANNER

नायर रुग्णालयात शनिवारी 'युरोलॉजी' वर मोफत कार्यशाळा


मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयात दुर्बिणीद्वारे युरोलॉजी शस्त्रक्रियेबाबत डॅाक्टरांसाठी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला होणारी ही कार्यशाळा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यामध्ये मूत्रपिंड विषयक विविध शस्त्रक्रिया करताना घ्यावयाच्या काळजीसह सदर शस्त्रक्रिया प्रभावीपणे करण्याबाबत ज्येष्ठ डॉक्टरांद्वारे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे

'किडनी स्टोन' काढण्यासह मूत्रपिंड (किडनी) विषयक विविध वैद्यकीय उपचार करताना अनेकदा शस्त्रक्रियेची गरज असते. ही शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे केल्यास ती बिनटाका असल्याने कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमीत कमी त्रासात करता येते. या पार्श्वभूमीवर दुर्बिणीद्वारे युरोलॉजी शस्त्रक्रियेबाबत एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नायर रुग्णालयातील युरोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. हेमंत पाठक यांनी दिली आहे.

युरोलॉजी विषयक एकदिवसीय विशेष कार्यशाळेत डॉ. हेमंत पाठक यांच्यासह नायर रुग्णालयातील डॉ. मुकुंद आंदणकर, कल्याण येथील कावेरी युरोडर्म सेंटरचे डॉ. के. एम. नंज्जप्पा, पालिकेच्या शीव येथील टिळक सर्वेापचार रुग्णालयातील प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. अजित सावंत, महापालिकेच्याच रा. ए. स्मा. (केईएम) रुग्णालयातील डॉ. भूषण पाटील आणि नायर रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. तरुण जैन हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेच्या सुरुवातीला अत्याधुनिक साधनांसह दुर्बिणीद्वारे करावयाच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियांची माहिती उपस्थित डॉक्टरांना थेट प्रक्षेपणाद्वारे दिली जाणार आहे. यानंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना लेझर किरणांचा वापर कसा करावा? याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. तसेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणा-या अत्यंत लवचिक 'स्कोप' बाबत देखील या कार्यशाळेत सांगोपांग चर्चा होणार आहे. तर कार्यशाळेच्या शेवटी 'युरोलॉजी' विषयक शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने एका 'पॅनल डिस्कशन'चे आयोजन देखील करण्यात येणार आहे, असे माहिती विभाग प्रमुख डॉ. पाठक यांनी सांगितले.
Previous Post Next Post