Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोर्टाचा निर्णय हा डॉ. आंबेडकरांचा सन्मान - शरद पवार


मुंबई- महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत परीक्षण घ्या, असा आदेश न्यायालयानं दिला आहे. या निर्णयानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. संविधान दिनी कोर्टाचा निकाल आला आहे, हा निर्णय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आहे याचा अधिक आनंद आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आम्ही विश्वासमत जिंकू असं महाविकास आघाडीचे नेते म्हणताहेत.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं आज यावर महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. लोकांना चांगलं सरकार मिळवण्याचा अधिकार आहे, असं मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडलं. महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला. बहुमत चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसंच मतदान हे गुप्त पद्धतीनं नको, असंही न्यायालयानं सांगितलं. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा द्यावा, असं सांगून आम्ही न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी आहोत, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानसभेत आम्हीच बहुमत प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom