‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण – २०२०’ मूल्‍यांकन स्‍पर्धेत सहभागी होण्‍यास मुदत वाढ - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2019

‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण – २०२०’ मूल्‍यांकन स्‍पर्धेत सहभागी होण्‍यास मुदत वाढमुंबई - मुंबई महानगरपालिकेच्‍यावतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ अंतर्गत घेण्यात येणा-या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी अर्ज करण्‍याची मुदत आता २५ नोव्‍हेंबरपर्यंत असणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

महानगरपालिकेच्‍या हद्दीतील निवासी संकुल, मोहल्ल्ले, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स, शाळा, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान संस्था व महानगरपालिकेच्या कार्यालयीन इमारती यांची स्‍वच्‍छता तपासणी या स्पर्धेसाठी केली जाते. तपासणीनंतर मानांकन ठरवून विजेत्‍यांना पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या स्‍पर्धेमध्‍ये अधिकाधिक घटकांना सहभागी होता यावे, यासाठी इच्‍छुकांना अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

केंद्र शासनाच्या गृह व नागरी खात्याने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ अंतर्गत निकष आखून दिले आहेत. त्‍याआधारे मानांकने ठरवून गौरवले जाणार आहे. केंद्र शासनाने ठरविलेल्या निकषांच्याआधारे या सर्व घटकांतील संस्थांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागवून मे. युनायटेड वे मुंबई या खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. महानगरपालिकेने आपल्‍या हद्दीतील सर्व २४ विभागात ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ स्‍वच्‍छता श्रेणी तपासणी व मानांकन स्‍पर्धा अंतर्गत सहभागी होण्‍यासाठी या सर्व आस्थापनांकडून विहित नमुन्यात १५ नोव्‍हेंबर, २०१९ पर्यंत अर्ज मागविले होते. मात्र, अधिकाधिक संस्था, अर्जदारांना या स्पर्धेमध्‍ये सहभागी होता यावे, यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इच्‍छुकांनी अर्ज https://www.unitedwaymumbai.org/mcgmsurvekshan या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत अर्ज पाठवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्‍पर्धेतील निश्चित केलेल्‍या सर्व घटकांतील विजेत्यांचा महानगरपालिकेकडून प्रशस्ति‍पत्रे व बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कुणाला कसे मिळणार पारितोषिक --
स्‍वच्‍छ निवासी संकुल, स्‍वच्‍छ रुग्‍णालय, स्‍वच्‍छ शाळा आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान संस्था या घटकांतील विजेत्‍यास प्रत्‍येकी दीड लाख रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. तर, स्‍वच्‍छ महापालिका रुग्‍णालय, स्‍वच्‍छ हॉटेल (उपहारगृह), स्‍वच्‍छ महापालिका शाळा, स्‍वच्‍छ सामुदायिक शौचालय, सार्वजनिक शौचालय या पाच घटकांतील विजेत्‍यास प्रत्येकी एक लाख रुपये पारितोषिक दिले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Post Bottom Ad