
सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे सकाळीच कार्यालय, शाळा - कॉलेजसाठी निघालेल्या नोकरदार, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान अरबी समुद्रामध्ये आगामी २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांसह उर्वरीत महाराष्ट्रात गुरूवारी पावसाचा अंदाज ‘स्कायमेट’कडून वर्तवण्यात आला होता. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, डिसेंबर महिना सुरु झाला तरी थंडीची चाहूल न लागल्याने मुंबईकरांमध्ये निराशा आहे. त्यातच अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे यंदा मुंबईकरांना गुलाबी थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.