जानेवारीपासून पालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजता सुरू होणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

13 December 2019

जानेवारीपासून पालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजता सुरू होणार


मुंबई - जानेवारी पासून पालिकेचे सर्व दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून सुरू राहणार आहेत. सध्या या दवाखान्यांची वेळ सकाळी ९ ते ४ अशी असल्यामुळे सकाळी कामावर जाणार्‍या नोकरवर्गाला पालिकेच्या या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेत येत नव्हता. त्यामुळेच पालिकेने हा निर्णय घेतला असून सर्वपक्षीय गटनेता बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण १८६ दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. या सेवेचा लाभ हजारो रुग्ण घेत असले तरी याच दरम्यान बहुतांशी सर्वच शासकीय-खासगी कर्मचार्‍यांच्या कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणार्‍या नोकरवर्गाला पालिकेच्या या आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. शिवाय सायंकाळी ४ वाजल्यानंतर दवाखाने बंद होत असल्याने औषधांकरिता रुग्णांना बराच वेळ दवाखान्यात थांबावे लागते. तसेच पालिकेच्याच दवाखान्यात उपचार घ्यायचे असल्यास कामावर जायला उशीर होतो किंवा सुट्टी घ्यावी लागते. शिवाय दवाखान्यांच्या ठराविक वेळेमुळे पालिकेच्या रुग्णसेवेचा लाभ घेऊ शकत नसणार्‍या गोरगरीबांना खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नोकरदारांच्या सुविधेसाठी पालिकेचे दवाखाने सकाळी ९ ऐवजी ८ वाजता सुरू करावेत अशी मागणीचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गटनेता बैठकीत मांडला होता. दवाखाने सकाळी ८ वाजता उघडल्यास मधुमेही रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे येत्या जानेवारीपासून पालिकेचे दवाखाने सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

४ ते रात्री ११ वेळेतील दवाखाने वाढणार -
नोकरवर्गाला पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा म्हणून आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या पाठपुराव्यातून पालिकेचे १५ दवाखाने सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पालिकेने अलीकडेच घेतला आहे. सध्या खासगीरीत्या हे दवाखाने वाढीव वेळेत चालवले जात असून रात्री ४ ते रात्री ११ यावेळेत आरोग्य सुविधा देणार्‍या दवाखान्यांची संख्या वाढवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post Top Ad

test
test