भटक्या कुत्र्यांची दशहत - हापकीनकडून ९० हजार लसी


मुंबई - मुंबईत भटक्या कुत्र्यांची दशहत वाढली असून प्रतिमहिना १५ हजार लोकांना चावा घेतात. यापार्श्वभूमीवर महापालिकेने हापकीनकडून सहा महिन्यांसाठी सुमारे ९० हजार लसींचा साठा उपलब्ध केला आहे.

शहरासह उपनगरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. मुले, शालेय विद्यार्थी सायकल, बाईकस्वार, कचरा गोळा करून उपजीविका करणारे लोक भटक्या कुत्र्यांचे शिकार होतात. मात्र, महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये श्वानदंश लसीचा तुटवडा असतो, अशी वारंवार बोंब असते. मुंबईतील एकूण रुग्णालये, दवाखाने तसेच आरोग्य केंद्रांपैकी १०१ ठिकाणी श्वानदंश लसीकरण केंद्र निर्माण केलेली आहे. यासर्व ठिकाणी मासिक साधारणत: १५००० श्वानदंश लस मात्रांची आवश्यकता लागते. श्वानदंश लस ही जीवनावश्यक औषध प्रकारात येत असून त्याचा योग्य प्रमाणात साठा संबंधित ठिकाणी केला जातो. परंतु या लसींच्या खरेदीचे कंत्राट संपुष्ठात आल्याने महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने निविदा मागवण्यास सुरुवात केली. मात्र सन २०१९-२०२१ या कालावधीसाठी आवश्यक असलेल्या श्वानदंश लस खरेदीसाठी वारंवार निविदा मागवूनही त्याला कोणताही प्रतिसाद न लाभल्याने या लसींची खरेदी महापालिकेने हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड या शासनमान्य संस्थेकडून करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका रेबीज लसीसाठी २३१ रुपये दराने मार्च २०२० पर्यंत सहा महिन्यांकरता ९० हजार लसींची खरेदी केली आहे. २ कोटी ०७ लाख रुपये यासाठी खर्च होणार आहे. यापैकी ४९ लाख ८९ हजार रुपये एवढी रक्कम आगाऊ दिली असून उर्वरीत दीड कोटींची रक्कम स्थायी समितीच्या मंजुरीनंतर दिली जाणार आहे. प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर कार्योत्तर मंजुरीसाठी ठेवला आहे.
Previous Post Next Post