ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ३६ मंत्र्यांचा शपथविधी


मुंबई, दि. 30 : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ आज येथील विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि 10 सदस्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

दुपारी एक वाजेच्या सुमारास शपथविधी सोहळ्याला प्रारंभ झाला. सर्वप्रथम अजित पवार यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यानंतर अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, विजय वड्डेटीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ.राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनिल केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादाजी भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, ॲड. यशोमती ठाकूर, ॲड.अनिल परब, उदय सामंत, ॲड.के.सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

अब्दुल सत्तार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभूराज देसाई, बच्चू कडू, डॉ. विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह 8 मंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली तर 24 मंत्र्यांनी ईश्वरसाक्ष घेऊन शपथ घेतली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिरंगासाक्ष शपथ घेतली. शपथ विधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता राष्ट्रगीताने झाली. या सोहळ्याला खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

क्षणचित्रे

· पोलीसांच्या बँड पथकाने सादर केलेल्या राष्ट्रगीताने शपथविधी समारंभास सुरुवात

· मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी कार्यक्रमाचे संचालन केले

· व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

· व्यासपीठावर शपथ घेणाऱ्या मंत्री महोदयांबरोबरच त्यांचे कुटुंबिय पत्नी, आई, मुलगा आदींसह उपस्थित होते.

· सर्वप्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

· मंत्रीमंडळात तीन महिला सदस्यांचा समावेश

· विधानमंडळ परिसरात उपस्थितांसाठी मोठ्या एलईडी स्क्रिनची सोय

· उपमुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली,

· तर 24 मंत्र्यांनी ईश्वरसाक्ष तर एका राज्यमंत्र्यांनी तिरंगा साक्ष शपथ घेतली.

· माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे आदी समारंभास उपस्थित.

· मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संबंधित मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होत होता.
Previous Post Next Post