Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

एनआरसी कायद्याच्या भीतीमुळे जन्म - मृत्यू नोंदीसाठी रांगा


मुंबई - सीएए, एनआरसी कायद्याच्या भीतीमुळे सद्या विभाग कार्यालयासमोर जन्म, मृत्यूच्या नोंदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणाचा फायदा दलालांकडून घेतला जात असल्याचा आरोप सपाचे नगरसेवक, आमदार रईस शेख यांनी केला. गुरुवारी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दा मांडून शेख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र या मुद्दयाशी सीएए, एनआरसीशी संबंध काय असा सवाल करीत भाजप व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.

जन्म, मृत्यू व विवाह संबंधीच्या नोंदी करून त्याची प्रमाणपत्र, दाखले घेण्यासाठी विभाग कार्यालयात यावे लागते. मात्र नोंदी करण्यास टाळाटाळ केली जाते. नोंदी करून त्याची प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांना सहा महिने, वर्षभर प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. येथील अधिकारी- कर्मचा-यांचा हलगर्जीपणा, दुर्लक्षामुळे नारिकांना त्रास सहन करावा लागतो. आता तर सीएए, एनआरसी कायद्याच्या भीतीने नागरिकांच्या विभाग कार्यालयासमोर रांगा लागत आहेत. अधिकारी, कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे याचा फायदा दलालांनी घेतला असल्याची माहिती सपाचे नगरसेवक, आमदार रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मांडला. येथे कर्मचारी, अधिका-यांची संख्या वाढवावी अशी मागणीही शेख यांनी स्थायी समितीत केली. मात्र या मुद्दयाशी सीएए, एनआरसीचा काय संबंध असा संतप्त सवाल करीत भाजपचे नगरसेवक संतापले. ही स्थायी समिती आहे, समस्येवर बोला, जन्म, मृत्यूचे दाखले वेळेत मिळत नाही, हा मुद्दा सत्य आहे, मात्र त्याच्याशी सीएए, एनआरसी कायदा जोडून राजकारण करू नये असे भाजपच्या नगरसेवकांनी ठणकावले. सपाचे नगरसेवक रईस शेख आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिल्याने भाजप, विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. जन्म, मृत्यूच्या नोंदी व प्रमाणपत्रे मिळण्यासाठी यापुढे विलंब लागू नये, नागरिकांना वेळेत मिळावेत. यासाठी कर्मचारी- अधिका-यांची संख्या वाढवावी असे निर्देश स्थायी समिती यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom