उत्कृष्ट नगरसेवक, अधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

03 January 2020

उत्कृष्ट नगरसेवक, अधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कार


मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबई महानगरपालिका या वर्षापासून शिवसेना बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार देणार आहे. शहरात उत्कृष्ट काम करणारे प्रभाग समिती अध्यक्ष, साहाय्यक आयुक्त, गुणवंत अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. राेख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांच्या निवडीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.  

मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी नागरी सोयीसुविधा देत असते. त्यामागे पालिकेचे साहाय्यक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांचा मोलाचा सहभाग असतो. नगरसेवकांची प्रभाग समिती आणि प्रभाग समितीचे अध्यक्षही मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी अहाेरात्र झटत असतात. याची दखल घेत महाराष्ट्र सरकारच्या पंचायत राज अभियानातर्फे पंचायत संस्थांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या धर्तीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार दिले जाणार आहेत. बाळासाहेबांच्या नावे पुरस्कार दिले जावेत, असा ठराव विद्यमान सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी २०१७ मध्ये प्रथम मांडला होता. उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीसाठी पालिका चिटणीसांकडे तर साहाय्यक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आपल्या क्षेत्रातील परिमंडळीय उपआयुक्तांमार्फत सहआयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्याकडे १० जानेवारीपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारीला हाेणाऱ्या जयंतीला पालिका सभागृहात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांची निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप
उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष पुरस्कारासाठी ५० हजार रुपये, उत्कृष्ट साहाय्यक आयुक्त पुरस्कारासाठी ३० हजार रुपये, उत्कृष्ट गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी ३० हजार रुपये, तीन उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी प्रत्येकी १० हजार रुपये, तीन उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कारांसाठी प्रत्येकी ५ हजार रोख रकमेसह स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Post Top Ad

test