Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वाडिया रुग्णालयात गैरव्यवहार


मुंबई - गरिब रुग्णांना अल्प शुल्क आकारून व गिरणी कामगारांना मोफत रुग्णसेवा देण्यासाठी सुरु झालेल्या वाडिया रुग्णालयातील गैरकारभार समोर आला आहे. एकाच कर्मचार्‍याला प्रसूती आणि बाल रुग्णालयाकडून दोन वेतन, आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात डॉक्टर-कर्मचार्‍यांची भरती आणि माफक दरात औषधोपचार दिले जात नसल्यामुळे वाडिया हॉस्पिटलचे मानधन रोखले असल्याचे स्पष्टिकरण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज दिले. दरम्यान याबाबत मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये याबाबतची सत्यता समोर आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असेही काकाणी यांनी सांगितले.

प्रसूती व लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेले परळ येथील वाडिया रुग्णालय २६ जुलै १९२६ व २ एप्रिल १९२८ साली साली सुरु करण्यात आले. पालिकेने रुग्णालय चालवण्यासाठी ही जमीन ट्रस्टला दिली. गिरणी कामगारांसाठी मोफत उपचार व गरिब रुग्णांना अत्यल्प शुल्क आकारून रुग्णालय चालवण्याचा करार झाला होता. मात्र अचानक केलेल्या पाहणीत नियमानुसार ठरलेले शुल्क न आकारता दुप्पट, तिप्पट शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच ट्रस्टने उत्पन्न व खर्चाचा आजमितीस अहवालही दिलेला नाही, असे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दोन्ही रुग्णालयात काम करणा-या १० ते १५ अधिकारी, कर्मचारी दुबार वेतन आणि निवृत्ती वेतन घेत असल्याचेही उघड झाले आहे. नियमानुसार रुग्णालय चालवले जात नसल्याने पालिकेने गेल्या डिसेंबर महिन्याचे २१ कोटी रुपये अनुदान दिले नाही. याबाबत मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वाडिया ट्रस्टचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

रुग्णालयात एकूण १२० अधिक १२६ अशा एकूण २४६ खाटा होत्या. त्यातील ५० खाटा गिरणी कामगारांसाठी मोफत सेवा देण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या. याबाबत वाडिया, राज्य सरकार व पालिका यांच्यात करार झाला. मात्र आजमितीस खाटांची संख्या ९२५ पर्यंत वाढली आहे. शासन निर्णयानुसार ३१८ पदे मंजूर आहेत. म्हणजेच ३१९ अधिकारी कार्यरत असतात. परंतु वाडिया रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. खाटा व स्टाफ वाढवण्याबाबत ट्रस्टने पालिका प्रशासनाला विचारात न घेता निर्णय घेतला. हे कराराचा भंग करणारे असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

डबल वेतन व पेन्शनही --
रुग्णालयात सहा व्यक्तींना प्रसूतीगृहाचे वेतन आणि बाल रुग्णालयाचे मानधनही मिळत असल्याचे समोर आले. तर दहा जणांना दोन्ही आस्थापनांकडून पेन्शन मिळत असल्याचे निदर्शनास आले. डबल मिळणारे वेतन १ लाख ६१ हजार ९४२ तर मानधन १ लाख ६५ हजार ५१२ इतके आहे.

वाडिया हॉस्टिपलचा कारभार वाडिया ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो. घेतलेल्या सर्व निर्णयांवर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची देखरेख असते. त्यानुसारच गेल्या काही वर्षांत निर्णय घेण्यात आले आहेत.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय

एकूण देणे रक्कम २१ कोटी -
पालिकेकडून बाल रुग्णालयाला १०० टक्के तर प्रसूतीगृहाला ५० टक्के अनुदान दिले जात होते. बॅलन्शिटनुसार ही रक्कम देण्यात येत होती. मात्र यामध्ये अनियमितता आढळल्यामुळे १० टक्के अनुदान रोखण्यात आले आहे. यामध्ये एकूण २१ कोटींची रक्कम पालिका वाडिया रुग्णालयाला देणार आहे. दरम्यान, पालिकेने रुग्णालयाचे १३७ कोटी थकवले असल्याचे वाडिया ट्रस्टकडून सांगण्यात आले.

वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही - महापौर
रुग्णालयातील अनियमिततांबाबत उद्या पालिका आणि वाडिया ट्रस्ट यांची निर्णायक बैठक होणार असून तोडगा काढला जाईल. वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom