महापौर चषक क्रीडा स्‍पर्धेच्‍या अनुदानात २० टक्‍के वाढ करणार – महापौर


मुंबई - महापौर चषक क्रीडा स्‍पर्धेत सहभागी संस्‍थांची सामुहिक मागणी लक्षात घेता सन २०२० – २०२१ या आर्थिक वर्षापासून महापौर चषक क्रीडा स्‍पर्धेच्‍या संस्‍थांना देण्‍यात येणाऱया अनुदानात २० टक्‍के इतकी वाढ करणार असल्‍याचे प्रतिपादन मुंबईच्‍या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले.

मुंबईच्‍या महापौर यांच्‍या नावाने मुंबई शहर व उपनगरात दरवर्षी महापौर चषक क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येत असून महापौर चषक क्रीडा स्‍पर्धा २०१९- २० करिता देण्‍यात येणारा महापौर निधी व स्‍पर्धेचे वेळापत्रक तसेच स्‍पर्धा आयोजित करणाऱया संघटना यांच्‍या सूचना व तक्रारी जाणून घेण्‍यासाठी मुंबईच्‍या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महापौर चषक क्रीडा स्‍पर्धेची आढावा बैठक महापालिकेच्‍या स्‍थायी समिती सभागृहात आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी पार पडली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

याप्रसंगी उप महापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्ष अमेय घोले, महापालिका सह आयुक्‍त (शिक्षण) (प्र.) आशुतोष सलि‍ल, शिक्षणाधिकारी महेश पालकर हे मान्‍यवर उपस्थि‍त होते.

सभागृह नेता  विशाखा राऊत यांनी कबड्डी व इतर खेळांना उपयुक्‍त होईल असे क्रीडा संकुल शहर व उपनगरात बांधण्‍याची सूचना महापौरांना केली. त्‍यानंतर महापौरांनी विविध क्रि‍डा संघटनांच्‍या प्रतिनिधींचे मनोगत जाणून घेतले. विविध संघटनेच्‍या प्रतिनिधींच्‍या मागणीनुसार त्‍यांच्‍याकडून सादर करण्‍यात येणाऱया बिलातील जीएसटी आकारणीमध्‍ये महापालिकेने सुट देण्‍यासाठी संबंधित संघटनांनी पत्रे द्यावी, त्‍यानंतर संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन योग्‍य तो सकारात्‍मक निर्णय घेणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले.त्‍याचप्रमाणे महापालिका संकुलात किंवा महापालिकेच्‍या जागेवर आयोजित महापौर चषक स्‍पर्धाना आकारण्‍यात येणाऱया भाडयामध्‍ये सुट देण्‍याचा निर्णय महापौरांनी यावेळी जाहिर केला. तसेच नव्‍याने समावेश झालेल्‍या सात संस्‍थांच्‍या सहभागाला यावेळी महापौरांनी मंजूरी दिली. याप्रसंगी क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
Previous Post Next Post