वाडिया रुग्णालयाची जमीन हडपण्याचा डाव हाणून पाडू - आशिष शेलार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2020

वाडिया रुग्णालयाची जमीन हडपण्याचा डाव हाणून पाडू - आशिष शेलार


मुंबई- लहान मुलांसाठी आणि प्रसुतीसाठी वाडिया रुग्णालय प्रसिद्ध आहे. पालिकेकडून अनुदान मिळत नसल्याने सध्या ते बंद होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, एका आठवड्यात अनुदान देऊ, असे पालिकेचे म्हणणे आहे. यामध्ये जो काही वाद आहे तो ताबडतोब मिटवून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अन्यथा जागा हडपण्याचा तुमचा हा डाव आम्ही हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी दिला आहे.

आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र दिले आहे. परेल येथे वाडिया ट्रस्टचे रुग्णालय गेल्या ९० वर्षांपासून सुरू आहे. लहान मुलांवर उपचारांसाठी आणि प्रसुतीसाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. या रुग्णालयाला पालिकेकडून अनुदान दिले जाते. मात्र, पालिकेने रुग्णालयाला १३७ कोटी रुपयांचे अनुदान दिलेले नाही. यामुळे रुग्ण सेवा आणि कर्मचाऱ्यांचे पगार यावर परिणाम झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. तर, पालिका थकीत अनुदान एका आठवड्यात देईल. मात्र, रुग्नालयात असलेला अनागोंदी कारभार, बेकायदेशीर केलेली भरती, रुग्णांना स्वस्त औषधे न देणे याची चौकशी होईपर्यंत १० टक्के रक्कम पालिका राखून ठेवेल, असे पालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी म्हटले आहे.

वाडिया ट्रस्ट आणि पालिका यांच्यात वाद सुरू असताना त्यात राजकीय पक्षांनी देखील उडी मारण्यास सरुवात केली आहे. मनसेच्या आंदोलनानंतर भाजपचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी रुग्णालयाची जमीन हडपण्याचा डाव वाडिया ट्रस्ट आणि पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा असल्याचा आरोप केला आहे. हे रुग्णालय गरिबांना परवडणारे रुग्णालय आहे. यामुळे महापौरांनी राजकीय दबावाला बळी न पडता त्वरित बैठक घेऊन रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे आवाहन केले आहे. असे न झाल्यास भाजप जमीन हडपण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

Post Bottom Ad