Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी


पुणे - किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता 23 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, पी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्ह्याचा 650 कोटी रु.चा वार्षिक आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी परिसर विकासासाठी 23 कोटी रु.चा निधी दिला जाईल. राज्याच्या आगामी अर्थ संकल्पात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. शालेय शिक्षण, अंगणवाड्या, आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, शिक्षण यांची माहिती सर्वांना होण्यासाठी 'जिजाऊ माता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथ' या घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल. तसेच वयस्कांच्या सोयीसाठी रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संवर्धन महत्वाचे आहे. बॉस्टन विद्यापीठात 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरु' अशी 100 गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठ्यपुस्तकांतून शिवाजी महाराजांवरील गौरवपर धड्याचा समावेश ही शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुणा धर्माविरुद्ध नव्हती, तर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती. महाराजांचा कित्ता गिरवणे, ही आजची गरज आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom