Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जीएसटी भवनात शुकशुकाट


मुंबई - माझगावमधील जीएसटी भवनात सोमवारी अग्नितांडव घडल्यानंतर आज कडेकोट बंदोबस्तात बेस्टने इमारतीचे ऑडिट सुरू केले. जीएसटी भवनात अनेक महत्त्वाच्या फाईल आणि कागदपत्रे असल्यामुळे भवनाबाहेर पोलीस, अग्निशमन दल यांच्या गाड्या उभ्या होत्या. ऑडिट सुरु असल्यामुळे आत जायला बंदी होती. दरम्यान, कालच्या अग्नितांडवामुळे भवनातील कर्मचाऱ्यांना आज आणि उद्या (शिवजयंतीनिमित्त) अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या जीएसटी भवनात आज शुकशुकाट होता. 
 
माझगावमधील जीएसटी भवनाला सोमवारी साडेबारा वाजता लागलेल्या आगीत भवनाचे तीन मजले जळून खाक झाले. यात काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फायलीही जळाल्याचे म्हटले जात आहे. सुदैवाने या आगीतून भवनातील २ ते अडीच हजार कर्मचारी बचावले. आगीनंतर बेस्टने तातडीने इमारतीचा वीजपुरवठा तोडला होता. त्या पार्श्वभूमीवर, आज बेस्टने जीएसटी भवनचे इमारतीचे ऑडिट सुरू केले. उद्या अग्निशमन दल ऑडिट करणार आहे. ऑडिटचे हे काम पूर्ण झाल्यावर आणि काम करण्यास परवानगी मिळाल्यानंतरच इमारतीत पहिल्यासारखे कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, भवनात आज जीएसटी आयुक्तांसह इतर अनेक अधिकारी उपस्थित होते. काही कर्मचारीही आले होते. मात्र, ऑडिटचे काम सुरू असल्यामुळे त्यांना इमारतीच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. 
 
आणखी ३५ अग्निशमन केंद्रांची गरज
माझगावच्या जीएसटी भवनाला लागलेल्या आगीवर आज स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. त्यावर अग्निशमन दलाने आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत अग्निशमन दलाची ३५ केंद्रे आहेत. मात्र, तरीही मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता आणखी ३५ केंद्रांची गरज असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी स्थायी समितीला सांगितले. मुंबई अग्निशमन दल हे आशियातील सर्वौतम अग्निशमन दल आहे. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अग्निशमन दलाने आतापर्यंत १० हजार स्वयंसेवकांना तर छोट्या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या २ हजारहून अधिक कामगारांनाही आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रशिक्षण दिल्याचे रहांगदळे यांनी सांगितले. 
 
आगीचा सविस्तर अहवाल सादर करा!
जीएसटी भवनाला लागलेल्या आगीबद्दल स्थायी समिती सदस्यांच्या मनात शंका आहे. ही आग का, कशी लागली याची संपूर्ण माहिती समितीला सादर करा, अशी मागणी आज स्थायी समितीत सर्व सदस्यांनी केली. अग्निशमन दलाला सक्षम बनवण्यासाठी पालिका निधी कमी पडू देणार नाही. मात्र, आगीच्या घटना रोखण्यासाठी अग्निशमन दलाने उपाययोजना आखाव्यात, असे सदस्यांनी पालिका प्रशासनाला सुनावले. 
 
सर्व सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करा !
अनेक सरकारी इमारतीमध्ये बाहेर कॉरीडोरमध्येही महत्त्वाची कागदपत्रे ठेवली जातात. त्यामुळे आग लागली तर हीच कागदपत्रे प्रथम जळून खाक होतात. अशा आगीबाबत सगळ्यांच्या मनात शंका निर्माण होते. त्यामुळे सर्व सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करा, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. विभागीय कार्यालयामार्फत आग प्रतिबंधक कामासाठी आलेला निधी खर्च होतो की, नाही याचा आढावा प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने घ्यावा. आयुक्तांनी अग्निशमन दलाला उपकरणे, मनुष्यबळ पुरवावीत. जागेची अडचण लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मिनी फायर स्टेशन बांधावीत तसेच जीएसटी भवनाच्या आगीचा सविस्तर अहवाल चार दिवसात स्थायी समितीला सादर करा, असे आदेशही जाधव यांनी दिले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom