भाजपचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा फेटाळला, सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

05 March 2020

भाजपचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा फेटाळला, सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन


मुंबई -- मुंबई महापालिकेत दुस-य़ा क्रमांकाचा पक्ष असल्याने पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे हा भाजपचा दावा महापौरांनी फेटाळला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा नगरसेवकांनी महापौरांचा निषेध करीत सभागृहाबाहेर ठिय्या मांडत महापौर हाय हाय अशा घोषणा देत पालिका दणाणून सोडली. याप्रकरणी वेळ आली तर न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे विरोधीनेतेपदाचा वाद चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समिकरण बदलते आहे. याचा परिणाम आता मुंबई महापालिकेतही दिसायला सुरुवात झाली आहे. भाजपने २०१७ च्या निवडणुकीनंतर पालिकेत दुस-या क्रमांकाचा पक्ष असूनही विरोधी पक्षनेतेपदावरचा दावा सोडला होता. पालिकेतील समित्यांमधील कोणतेही पद न स्वीकारता पहारेक-याची भूमिका घेतली. मात्र आता राजकीय समिकरणे बदलायला लागल्याने भाजपने तीन वर्षानंतर पालिकेत विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी तसे पत्रही महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले. या पत्रात विरोधीपक्ष नेतेपदी व गटनेते पदावर नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची निवड केली असून त्यांच्या नावाची सभागृहात घोषणा करावी अशी मागणी भाजपने पत्रात केली होती. त्यानुसार गुरुवारी पालिका सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या गटनेतेपदावर प्रभाकर शिंदे यांनी निवड झाली असल्याचे घोषित केले. मात्रा विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा २०१७ ला करण्यात आली असल्याचे सांगत भाजपचा विरोधीपक्षनेतेपदाचा दावा महापौरांनी फेटाळून लावला. यावेळी आक्रमक झालेल्या भाजपने यावर हरकतीचा मुद्दा मांडून चर्चा करण्याची मागणी केली, मात्र या मागणीकडे महापौरांनी दुर्लक्ष करून गदारोळातच कामकाज सुरु ठेवले. त्यामुळे संतापलेल्या भाजपने उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. चर्चा करू न दिल्याने भाजपने सभात्याग करीत सभागृहासमोर ठिय्या मांडला. महापौर हाय हाय... कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय.. विरोधीपक्षनेतेपद आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणा देऊन पालिका दणाणून सोडली. दरम्यान पालिकेत विरोधीपक्षनेते पद आधीच जाहीर करण्यात आले असल्याने त्या पक्षाने हे पद सोडल्यानंतरच भाजपला दावा करता येऊ शकतो, या या नियमाचा आधार घेत शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली असून येत्या काळात यावरून शिवसेना - भाजपमध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेत महाविकास आघाडीचे संकेत -
भाजपने सभात्याग केल्यानंतर सद्या विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या निर्णयाचे स्वागत करीत महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देऊन यापुढे पालिकेत महाविकास आघाडी होणार असल्याचे संकेत दिले. विरोधीपक्षनेतेपदी राहून शिवसेनेला साथ द्यायची व भाजपची कोंडी करायची असा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केला जाण्याची शक्यता आहे.

ही लोकशाहीची हत्या -
मुंबई महापालिकेतील सद्याचे चित्र बदलले आहे. भाजप पालिकेतील दुस-या क्रमांकाचा पक्ष असल्याने आम्हाला विरोधीपक्षनेते पद मिळावे असा दावा केला होता. मात्र महापौरांनी तो फेटाळला. आम्ही हरकतीचा मुद्दा मांडून लोकशाहीच्या मार्गानुसार यावर चर्चेची मागणी केली. मात्र चर्चाही करू दिली नाही. त्यामुळे महापौरांनी लोकशाहीची हत्या केली आहे. लोकशाहीनुसार विरोधीपक्षनेतेपद आम्हाला मिळायला हवे. ते लोकशाहीच्या माध्यमातून मिळवू. वेळ आली तर न्यायालयातही दाद मागितली जाईल.
प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते

गटनेतेपदी प्रभाकर शिंदे यांची घोषणा -
लोकसभा निवडणुकीत निवडून खासदार झाल्याने मनोज कोटक यांना पालिकेत गटनेतेपदासाठी वेळ देता येत नसल्याने काही दिवसापूर्वी प्रभाकर शिंदे यांची भाजपने गटनेतेपदी निवड केली. गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे यांच्या नावाची सभागृहात अधिकृत घोषणा केली.

Post Top Ad

test