मालमत्ता कर थकविणा-या ३,५६४ मालमत्तांवर कारवाई, २६२ मालमत्तांचे पाणी तोडले


मुंबई - महापालिकेचा मालमत्ता कर थकवणा-या आणि वारंवार मागणी करुनही करांचा भरणा न करणाऱ्या ३ हजार ५६४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २६२ मालमत्तांची जल जोडणी तोडण्यात आली, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. 

मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार मालमत्ता कर थकबाकीपोटी महापालिका क्षेत्रातील २६२ मालमत्तांची जल जोडणी तोडण्यात आली आहे. यामध्ये शहर भागातील ६४ मालमत्ता आणि पूर्व व पश्चिम उपनगरातील अनुक्रमे १०४ व ९४ मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक जलजोडणी तोडण्याची कारवाई ही 'एल' विभागात करण्यात आली असून या विभागात ५८ मालमत्तांची जलजोडणी तोडण्यात आली आहे. तर या खालोखाल 'पी उत्तर' विभागात ३० आणि 'टी' विभागात २६ मालमत्तांचे पाणी तोडण्यात आले आहे.

शहर भागातील ९ प्रशासकीय विभागांमध्ये 'एफ उत्तर' विभागात सर्वाधिक म्हणजे १४७ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरातील ६ प्रशासकीय विभागांमध्ये सर्वाधिक कारवाई ही 'टी' विभागात ४८१ मालमत्तांवर आणि पश्चिम उपनगरातील ९ प्रशासकीय विभागांमध्ये 'आर उत्तर' विभागात सर्वाधिक म्हणजे ३२९ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईच्या प्रक्रियेमुळे आता या मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध असणार आहेत. यानंतरही या मालमत्तांकडे बाकी असलेल्या विविध करांचा भरणा न केल्यास या मालमत्तांवर जप्ती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 

अंधेरी पश्चिम परिसरात 'मे. जवेरी कंन्स्ट्रक्शन' यांच्या अखत्यारितील एक एका मालमत्तेवर रुपये ४० लाख, ४९ हजार ५७६ एवढ्या रकमेची मालमत्ता कराची थकबाकी होती. या संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु करताच संबधित मालमत्ता धारकाद्वारे त्यांच्यावरील संपूर्ण थकबाकीची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली. ज्यानंतर सदर कारवाई थांबविण्यात आली. तसेच अंधेरी पश्चिम परिसरात ऍक्मे रिजन्सी को. ऑप. सोसायटी येथील 'सोनी मोनी शॉप' यांच्यावर वर्ष २०१० पासून रुपये १ कोटी २३ लाख ६६ हजार ३७७ एवढ्या रकमेची मालमत्ता कराची थकबाकी होती. या अनुषंगाने आज सदरहू मालमत्ता धारकावर चल संपत्ती जप्त करण्याविषयीची नोटीस बजावण्यात आली आहे.
Tags