Type Here to Get Search Results !

कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई पालिका सज्ज


मुंबई - जगभरात शेकडो बळी घेऊन अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहचवणार्‍या ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी पालिका सज्ज झाली आहे. परदेशातून येणा-या प्रवाशांची विमानतळावर थरमल स्कॅनरने तपासणी केली जाते आहे. आतापर्यंत ६५०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्रात आतापर्यंत एकही कोरोना पॅाझिटिव्ह रुग्ण साप़डलेला नाही. दरम्यान, बुधवारी तीन संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत शेकडोंचे जीव गेले घेतले आहे. आता भारतातही २८ रुग्ण आढळले आहेत. मुंबई, महाराष्ट्रात ४०० संशयित रुग्ण आढळले, मात्र ते तपासणीनंतर निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात एकही कोरोना पॅाझिटिव्ह आढळला नसल्याचे काकाणी यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी विमानतळावर मुंबई महापालिकेची टीम तैनात करण्यात आली असून परदेशातून येणा-य़ा पर्यटकांची तपासणी केली जाते आहे. आतापर्यंत ६५ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६२ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. बुधवारी आणखी तीन संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल सादर केला जाईल. राज्य सरकारकडून प्राप्त झालेली मार्गदर्शक तत्वे सर्व वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, खासगी रुग्णालये तसेच मनपा व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना प्रसारित करण्यात आली आहे. संशयित रग्णांचे १४ दिवस निरिक्षणाखाली ठेवले जाते. आतापर्यंत ३०० संशयित रुग्णांच्या घरी जाऊन भेटी देण्यात आल्या. सद्या हवाई प्रवास करणा-यांची तपासणी केली जाते आहे. यापुढे आवश्यक भासल्यास रेल्वेसेवेच्या ठिकाणीही तपासणी केली जाईल. पालिकेच्या रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णसेवेसाठी प्रशिक्षित डॉक्टर्स व नर्सेस तैनात करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोरोना प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. लोकांनीही याबाबत जागृत राहावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा --
आधी रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र त्याचा अहवाल मिळेपर्यंत वेळ जात होता. त्यामुळे मुंबईत कस्तुरबा रुग्णालयातच अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. येथे तीन तासात तपासणी केली जाते. अहवाल मिळेपर्यंत पाच तास लागतात. निदान कमी वेळात होत असल्याने पुढची उपाययोजना करणे सोपे जाते आहे.

काय काळजी घ्यावी --
हात धुणे, अर्धवट शिजवलेले व कच्चे अन्न, शिळे मांस न खाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, शिंकताना रुमालाचा वापर करावा. लक्षणे दिसल्यास मास्कचा वापर करावा, वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

लक्षणे --
३८ डिग्रीसेंटीग्रेड पेक्षा जास्त ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, डोके दुखी, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे

नमुन्यांची तपासणी -
कस्तुरबा रुग्णालयात घसा व नाकाच्या स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी दोन पाळ्यात करण्यात येते. त्याचा अहवाला लवकरात लवकर देण्यात येतो.

उपाययोजना -
कोरोना व्हायरसला प्रतिबंध उपचार व नियंत्रण याबाबत मार्गदर्शक तत्वे सर्व सरकारी, महापालिका व खासगी रुग्णालयात प्रसारित करण्यात आली आहे.
- कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत विलिगीकरण कक्ष स्थापन
-- एचबीटी रुग्णालयात २० खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापन
-- कुर्ला भाभा, बांद्रा भाभा, व राजावाडी रुग्णालयातही विलगीकरण कक्ष
-- कोरोना रुग्णांसाठी प्रमुख खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्यास सूचना करण्यात आली असून येथेही विलगीकरण कक्ष तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-- ५०० पेक्षा जास्त खाटा उपलब्ध करण्यात येत आहेत.

प्रशासकीय उपाययोजना --
--- साधन सामुग्रीसाठी २ कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
-- विलगीकरण खोल्यात एअर कंडीशनर बसवण्यात येत आहे.
-- औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

Top Post Ad

Below Post Ad