Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

होळीसाठी अनधिकृतपणे झाड तोडल्यास एक वर्षापर्यंत कारावास


मुंबई - होळी सणाच्या दिवशी सार्वजनिक परिसरातील तसेच सोसायटी किंवा खाजगी आवारातील झाड तोडल्यास किंवा छाटल्याचे आढळून आल्यास एक वर्षाचा कारावासाची शिक्षा केली जाणार आहे. संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

'होळी' सणाच्यावेळी सार्वजनिक रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीमध्ये जाळण्यासाठी तोडली किंवा छाटली जाण्याची शक्यता असते. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. या प्रकारावर नियंत्रणासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिका-यांनी लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परिसरातील झाडांसह सोसायटी किंवा खाजगी आवारातील झाड तोडल्याचे किंवा छाटल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतिकात्मक 'होळी' साजरी करण्याचे आवाहन उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

अशी होऊ शकते कारवाई --
'महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५' च्या 'कलम २१' मधील तरतूदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे, हा अपराध आहे. असे झाल्यास कमीतकमी १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच कमीतकमी १ हजार ते ५ हजार रुपये एवढा दंड होऊ होऊ शकतो.

२९ लाख ७५ हजार २८३ झाडे -
महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. तसेच १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.

येथे तक्रार करा --
महापालिका क्षेत्रात अनधिकृत व बेकायदेशीर वृक्ष छाटणी होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील उद्यान खाते यांच्याकडे नागरिकांना तक्रार करता येईल. याबाबत '१९१६' या दूरध्वनी क्रमांकावरही तक्रार नोंदवता येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom