Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'त्या' विमानाने मॉरिशसला अडकलेले विद्यार्थी परत आणा - अशोक चव्हाण



मु़ंबई, दि. ५ मे २०२०: येत्या शनिवारी मॉरिशसहून एक विशेष विमान मुंबईला येणार असल्याची माहिती असून, त्या विमानाने तिथे अडकलेले भारतीय विद्यार्थी परत आणण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, नागरी विमान उड्डयमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगीत झाल्याने भारतातील अनेक विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या इंटर्नशिपसाठी गेलेले महाराष्ट्राच्या नांदेडसह विविध जिल्ह्यातील सुमारे ५० विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी १८ ते २१ वयोगटातील असून, त्यांची इंटर्नशिप पूर्ण झालेली आहे. हे विद्यार्थी मार्च महिन्यातच भारतात परतणार होते. परंतु, विमानसेवा स्थगीत झाल्याने ते अद्याप मायदेशी परत येऊ शकलेले नाहीत.

भारतात अडकून पडलेल्या मॉरिशसच्या नागरिकांना मायदेशी परत नेण्यासाठी शनिवार, दि. ९ मे २०२० रोजी एअर मॉरिशसचे एक विशेष विमान मुंबईला येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात खातरजमा करून मुंबईला येणाऱ्या या विमानाने अभ्यासक्रम पूर्ण झालेले हे कमी वयाचे विद्यार्थी मायदेशी आणावेत, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom